नाशिक : पुरस्कारप्राप्त सायकलपटूच फोडायचा दानपेट्या, पोलिसांनी ‘असा’ पकडला

theft,www.pudhari.news

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

इगतपुरी शहरात एकाच रात्री तीन ठिकाणांच्या मंदिरातील पूजेचे साहित्य व दानपेटयातील रक्कम चोरणाऱ्या भुरट्या चोराला इगतपुरी पोलिसांनी अवघ्या १२ तासांत जेरबंद केले. विशेष म्हणजे हा भुरटा जिल्हास्तरीय पातळीवर पुरस्कारप्राप्त सायकलपटू आहे.

शहरातील नेहरू चौक भागातील तीन लकडी पुलाजवळील बालाजी मंदिर, बजाज भवनाजवळील शीतलामाता मंदिर, बाजारपेठेमधील शिवमंदिर या ठिकाणी पहाटेच्या सुमारास दानपेटी फोडून त्यातील रोख रक्कम व मंदिरातील पितळी व चांदी धातूची पूजेची भांडी, समई, घंटेची चोरी केली होती. पोलिस निरीक्षक राजू सुर्वे यांनी तपासाचे चक्र फिरवत संशयित नीलेश बोराडे (३३) याला श्रीरामवाडी (घोटी) येथे अटक केली. विशेष म्हणजे नीलेशने यापूर्वी जिल्हास्तरावर सायकल शर्यत स्पर्धेत पुरस्कार मिळविलेले आहे. त्याच्याकडून मंदिराचा सर्व मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. त्याने घोटी येथे आणखी एक मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली आहे. इगतपुरी पोलिस ठाणे हद्दीतील तळोशी येथील मंदिरावरील कळस चोरीचा गुन्हाही या तपासात उघडकीस येण्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. तो चोरीकडे का ‌वळला, याचाही पोलिस तपास करत आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : पुरस्कारप्राप्त सायकलपटूच फोडायचा दानपेट्या, पोलिसांनी 'असा' पकडला appeared first on पुढारी.