नाशिक पोलिसांचे संकेतस्थळ होतेय ‘अपडेट’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नागरिकस्नेही पोलिस यंत्रणेसाठी सर्वच स्तरावरून प्रयत्न सुरू असून, त्याचाच एक भाग म्हणून पोलिसांचे संकेतस्थळ अद्ययावत केले जात आहे. पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांनंतर संकेतस्थळ अद्ययावत केले जात असून, नवीन संकेतस्थळ नागरिकांच्या पसंतीस उतरण्याची शक्यता आहे. मात्र, शहरातील घडामोडी व इतर माहिती दैनंदिन पातळीवर संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याची मागणीही होत आहे.

पोलिसांची प्रतिमा नागरिकस्नेही होण्यासाठी तसेच नागरिक व पोलिसांमधील विश्वास वाढवण्यासाठी पोलिस यंत्रणांमामर्फत वेगवेगळ्या पातळीवर ‘संवाद सेतू’ उभारला जात आहे. जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिस यंत्रणा वेगवेगळ्या माध्यमांतून संवाद साधत आहेत. त्यानुसार पोलिसांनी आता त्यांचे लक्ष सोशल मीडियासह संकेतस्थळावर केंद्रित केले आहेत. अनेक महिन्यांपासून अद्ययावत नसलेल्या पोलिसांच्या संकेतस्थळावर नागरिकांना ई-तक्रारीसह पोलिसांविषयी किंवा गुन्हेसंदर्भात माहिती मिळवण्यात अडचणी येत होत्या. मात्र, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशानुसार आता संकेतस्थळ अद्ययावत केले जात असून, एका क्लिकवर नागरिकांना अपेक्षित माहिती किंवा मदत मिळावी यादृष्टीने संकेतस्थळ तयार केले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. सद्यस्थितीत माहिती संकलित करून अद्ययावत केली जात आहे. येत्या काही दिवसांत संकेतस्थळ अद्ययावत होईल, असा विश्वास सूत्रांनी वर्तवला आहे.

सांख्यिकी कॉलमच काढला

संकेतस्थळावर शहरात दाखल गुन्ह्यांची माहिती २०२१ पर्यंत दाखवली जात होती. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष झाले व गुन्ह्यांची सांख्यिकी देणे बंद झाले. मात्र, संकेतस्थळ अद्ययावत केल्यानंतर गुन्ह्यांचा सांख्यिकी कॉलमच काढून टाकल्याने नागरिकांना गुन्ह्यांची माहिती मिळणार कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

संकेतस्थळावर उपलब्ध माहिती अशी

संकेतस्थळावर पोलिस अधिकाऱ्यांची सर्व माहिती, जबाबदारी, संपर्क क्रमांक उपलब्ध आहेत. राष्ट्रपती, पोलिस पदक प्राप्त पोलिसांची यादी आहे. नाशिक पोलिस आयुक्तालयाचा इतिहास, जुने छायाचित्रे उपलब्ध आहेत. वाहतूक नियमही दिले आहेत. तसेच निर्भया पथक, सायबर पोलिस, मोबाइल-दुचाकी चोरी, गहाळ झाल्यास तक्रार करण्यासाठी लिंक उपलब्ध आहे. शहरातील पोलिस ठाणे, चौक्यांची माहिती असून विविध शाखा, विभागांचीही माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक पोलिसांचे संकेतस्थळ होतेय 'अपडेट' appeared first on पुढारी.