नाशिक : फास्टॅगचा असाही झोल, गाडी दारातच अन् पडतो टोल !

एस. यू. व्ही. वाहन खरेदीकडे ग्राहकांचा कल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सध्याच्या फास्टॅग प्रणालीद्वारे कोणत्याही टोलनाक्यावर वाहनधारकाच्या बँक खात्यातून आपोआप ठराविक रक्कम कापली गेल्याशिवाय वाहन पुढे नेता येत नाही. मात्र, एखादे वाहन घराच्या पार्किंगमध्ये उभे असतानाही त्या वाहनाचा टोल कापला जाणे, ही आश्चर्याचीच बाब. असाच प्रकार पंचवटीतील मखमलाबाद रोड परिसरातील वाहनमालकाच्या बाबतीत घडला आहे. या प्रकाराने नेहमीच वादग्रस्त ठरलेल्या पिंपळगाव टोल प्रशासनासह फास्टॅग प्रणालीचा गलथान कारभार समोर आला असून, वाहनमालकालाही नाहक मनस्ताप सहन करावा लागला आहे.

घडलेला प्रकार असा की, मखमलाबाद रोडवरील जाणता राजा कॉलनीतील वृत्तपत्र विक्रेते विनोद पाटील यांच्या मालकीचे चारचाकी वाहन (क्र. एमएच 15 जीए 2144) आहे. शुक्रवारी (दि. 7) दुपारच्या सुमारास त्यांच्या भ्रमणध्वनीवर एक टेक्स्ट एसएमएस आला. फास्टॅग खात्यातून टोलची रक्कम 40 रुपये कपात झाल्याचा हा एसएमएस होता. एसएमएस वाचून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण त्यावेळी त्यांचे वाहन अभोणा येथील बार्डे या गावी घराबाहेर उभे होते. असे असतानाही नाशिक – धुळे महामार्गावरील पिंपळगाव टोलनाक्यावरून त्यांच्या वाहनाचा टोल वसूल करण्यात आला होता.

तांत्रिक अडचणीमुळे कदाचित असे झाले असेल. परंतु, संबंधित चालकाला आठ दिवसांत त्यांची रक्कम रिफंड केली जाईल. याबाबत मी पेटीएम, बँकेकडेही चौकशी केली आहे. याला बँकदेखील जबाबदार आहे. तसे पाहता ही काही विशेष बाब नाही. बर्‍याचदा असे प्रकार होत असतात. – योगेश सिंग, व्यवस्थापक, पिंपळगाव बसवंत टोल प्लाझा.

पिंपळगाव बसवंत येथील टोलनाक्यावर वादग्रस्त प्रसंग कायमच घडत असतात. राजकीय पक्षाच्या पदाधिकार्‍यांसह नेत्यांनाही अशा प्रसंगांना सामोरे जावे लागले आहे. त्यातून पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल होण्याचे प्रकारही झाले आहेत. फास्टॅगचा घोळ तर येथे कायमच होत असतो. त्यात या एका प्रकरणाची आणखी भर पडली आहे.

आम्ही शुक्रवारी सकाळी दिंडोरी रोडमार्गे आमच्या कारने अभोण्याला आमच्या गावी गेलो होतो. तिथे घराबाहेरच वाहन उभे असताना अशा प्रकारे फास्टॅगच्या खात्यातून टोल शुल्क कपात होणे चुकीचेच आहे. रक्कम केवळ 40 रुपये आहे, परंतु असा प्रकार घडणे बेजबाबदारपणाचे आहे. याबाबत फास्टॅग प्रणाली आणि टोल प्रशासनाने दक्षता घेणे गरजेचे आहे. – विनोद पाटील, वाहनमालक, पंचवटी, नाशिक.

हेही वाचा:

The post नाशिक : फास्टॅगचा असाही झोल, गाडी दारातच अन् पडतो टोल ! appeared first on पुढारी.