नाशिक : बंदुकीचा धाक दाखवून पाच जणांच्या टोळक्याने लुटली 25 किलो चांदी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
बंदुकीचा धाक दाखवून पाच जणांच्या टोळक्याने तिघांकडून 25 किलो 523 ग्रॅम वजनाची चांदी लुटून नेल्याची घटना उघडकीस आली. रविवारी (दि. 21) रात्री पावणेबाराच्या सुमारास ठक्कर बाजारजवळील किशोर सुधारालयासमोर ही घटना घडली असून, या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमितसिंग धनसिंग सिकरवार (24, रा. फावडे लेन, मूळ रा. उत्तर प्रदेश) हा जय बजरंग कुरिअर आणि पार्सल सर्व्हिसेस येथे नोकरी करतो. अमितसिंग आणि त्याचे सहकारी नाशिकसह जळगाव येथील सराफ व्यावसायिकांकडून सोने-चांदीचे दागिने घेऊन परजिल्ह्यात पोहोचविण्याचे काम करतात. नेहमीप्रमाणे अमितसिंगने शहरासह जळगावातील काही सराफांकडून घेतलेली साडेपंचवीस किलो चांदी गोळा केली होती. ही चांदी पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद येथे पाठविण्यासाठी रविवारी (दि. 21) रात्री पावणेबाराच्या सुमारास एमएच 12 टीएफ 7512 क्रमांकाच्या दुचाकीवरून अमितसिंग, राज शर्मा व विष्णुकुमार सिसोदिया हे तिघे ठक्कर बाजारच्या दिशेने जात होते. किशोर सुधारालयाजवळ येताच मागून आलेल्या दोन दुचाकींवरील पाच संशयितांनी त्यांना अडविले. संशयितांनी तिघांना बंदुकीचा धाक दाखवून चालक राज शर्माला मारहाण करीत इतर दोघांना खाली पाडले. बंदूक पाहून राज आणि विष्णू तेथून पसार झाले. त्यानंतर दुचाकीवरील 12 लाख 25 हजार रुपयांचे चांदीचे पार्सल व 50 हजार रुपयांची दुचाकी घेऊन संशयित पसार झाले. संशयितांनी त्यांच्याकडील एमएच 15 जीएस 5966 क्रमांकाची दुचाकी घटनास्थळावरच ठेवून पळ काढला.

घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयितांचा शोध सुरू केला आहे. शहर व ग्रामीण पोलिसांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या शासकीय निवासस्थानाजवळच हा प्रकार घडल्याने तो चर्चेचा विषय झाला आहे.

संशयितांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी पिंपळगाव बसवंत येथून चोरल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पाच पथके तयार केली असून, पथके संशयितांच्या मागावर आहेत.
साजन सोनवणे,
वरिष्ठ पोलिस निरीक्षक

हेही वाचा :

The post नाशिक : बंदुकीचा धाक दाखवून पाच जणांच्या टोळक्याने लुटली 25 किलो चांदी appeared first on पुढारी.