नाशिक : बारावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचे मोबाईल व दप्तर चोरीला

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

इयत्ता बारावीच्या परीक्षा कालपासून सुरू झाल्या असून यासाठी परीक्षेला येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दुचाकी गाडीतून दप्तरे व मोबाईल तसेच किमती वस्तू चोरून नेण्याचा प्रकार येथील बिटको महाविद्यालयाच्या बाहेर घडला असून यामुळे परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

इयत्ता बारावीच्या परीक्षा मंगळवार दिनांक 21 पासून सुरू झाल्या असून या परीक्षेसाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी विद्यार्थिनी वेळेवर परीक्षा केंद्रावर पोचण्यासाठी आपल्या दुचाकी गाडी घेऊन येतात. परीक्षा केंद्रावर आल्यानंतर हॉलमध्ये दप्तर तसेच मोबाईल व इतर किमती वस्तू नेण्यास मनाई असल्याने अनेक विद्यार्थी विद्यार्थ्यांनी आपल्या या वस्तू गाडीच्या डिक्की मध्ये ठेवतात मात्र विद्यार्थी परीक्षा हॉलमध्ये बसल्यावर बाहेर येऊ शकत नसल्याने या संधीचा फायदा घेऊन काही भुरटे चोर सदर गाडीच्या डिकी उघडून त्यामधील मोबाईल तसेच दप्तर चोरून नेण्याचा प्रकार काल घडला.  सुमारे दहा ते बारा विद्यार्थ्यांचे मोबाईल चोरून नेल्याचा प्रकार घडला असून याप्रकरणी मात्र अद्याप कोणी तक्रार दिली नसल्याचे समजते कारण तक्रार देण्यात बराच वेळ जातो त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास होत नाही यामुळे विद्यार्थ्यांनी तक्रार दिली नाही.

दरम्यान या प्रकारामुळे परीक्षार्थी विद्यार्थी व पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नेहमी परीक्षेच्या वेळेस असे प्रकार घडतात. यामागे एखादी मोठी टोळी असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. सदर चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी पालकांनी व विद्यार्थ्यांनी केली आहे.

दरम्यान या प्रकारानंतर उपनगर पोलीस व बिटको महाविद्यालयाच्या प्रशासनाने परीक्षेला येणाऱ्या विद्यार्थ्यांना आवाहन केले असून विद्यार्थ्यांनी येताना किमती वस्तू मोबाईल आणू नये असेही सांगण्यात आले आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : बारावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचे मोबाईल व दप्तर चोरीला appeared first on पुढारी.