नाशिक : बॅंक गॅरंटीचा नियम डावलून घंटागाडी ठेका देण्याचा घाट

घंटागाडी कर्मचारी पर्यावरण महोत्सव,www.pudari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेच्या वादग्रस्त घंटागाडीचा ठेका पुन्हा वादात सापडला असून, ठेकेदारांकडून पाच वर्षांच्या बँक गॅरंटीऐवजी केवळ एकाच वर्षाची बँक गॅरंटी घेऊन ठेका देण्याचा घाट घातला जात असल्याची बाब समोर आली आहे. ही बाब समोर येताच आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी घंटागाडी ठेक्याची फाइल मागवून घेत तपासणी सुरू केली आहे.

येत्या पाच वर्षांसाठी घंटागाडीचा ठेका देण्यात येत आहे. ३५४ कोटी रुपयांच्या या ठेक्यासाठी डिझेलचे वाढते दर आणि किमान वेतन तसेच कर्मचाऱ्यांची वाढीव संख्या अशी विविध कारणे देत ठेक्याचे प्राकलन वाढविण्यात आले आहे. हाच ठेका यापूर्वी १७६ कोटींचा होता. त्यामुळे नव्या ठेक्याविषयी संशय बळावला असून, त्याबाबत महासभा आणि स्थायी समितीनेदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. घंटागाडी ठेकेदारांना कार्यारंभ आदेश देण्यात येणार होता. मात्र, आयुक्त कैलास जाधव यांची बदली झाली. त्यानंतर स्थायी समितीची मुदत संपली आणि नवीन आयुक्त रमेश पवार यांनी पुन्हा एकूणच प्रक्रियेची तपासणी सुरू केल्याने कार्यारंभ आदेश देण्यात आला नाही. रमेश पवार आदेश काढणार होते तोच त्यांचीही तडकाफडकी बदली होऊन त्यांच्या जागी नूतन आयुक्त डॉ. पुलकुंडवार हे रुजू झाले आणि त्यांनी वादग्रस्त घंटागाडीच्या ठेक्याची पुन्हा तपासणी सुरू केली आहे. या तपासणीतच त्यांना बँक गॅरंटीची बाब निदर्शनास आली. बँक गॅरंटी भरल्याशिवाय कार्यारंभ आदेश दिला जात नाही. ठेकेदाराकडून काम करताना काही कुचराई झाल्यास, नुकसानभरपाई म्हणून बँक गॅरंटी घेतली जाते. परंतु, घंटागाडीच्या ठेक्यात पाच वर्षांची बॅक गॅरंटी भरून घेणे क्रमप्राप्त असताना, काही ठेकेदारांकडून केवळ एकाच वर्षाची गॅरंटी घेण्यात आल्याने संशय व्यक्त केला जात आहे. ही बाब लक्षात घेत आयुक्त डाॅ. पुलकुंडवार यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे आता सर्वच ठेकेदारांकडून बँक गॅरंटी घेण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून ठेकेदारांना सांगण्यात आले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : बॅंक गॅरंटीचा नियम डावलून घंटागाडी ठेका देण्याचा घाट appeared first on पुढारी.