नाशिक : ‘भाई’ जेलमधून सुटल्याने जल्लोष केला तो चांगलाच महागात पडला

नाशिक

नाशिक : पुढारी वृत्तसेेवा

मोक्कांतर्गत गुन्ह्यात कारागृहामध्ये असलेल्या सराईत गुन्हेगाराची सुटका झाल्यानंतर सुटकेचा जल्लोष करणे संबंधित गुन्हेगारासह त्याच्या समर्थकांना चांगलेच भोवले आहे. ‘आ गये भाई बाहर’ अशी घोषणा देत व्हिडिओ केल्याबद्दल नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शाहरूख रज्जाख शेख (रा. निमगाव खैरी, श्रीरामपूर) असे कारागृहातून सुटका झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्यासह १२ ते १५ समर्थकांवर कारवाई करण्यात आली आहे.

शाहरूख शेखच्याविरोधात १४ गंभीर गुन्हे दाखल असून, मोक्कानुसार कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे त्यास नाशिक मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. दरम्यान, प्रजासत्ताक दिनानिमित्त नाशिक मध्यवर्ती कारागृहातून चांगल्या वर्तवणुकीचे व शिक्षेचा निकाल लागलेल्या ३४ बंदीवानांची सुटका करण्यात आली. त्यानुसार शाहरुख शेखचीही मुक्तता गुरुवारी (दि. २६) करण्यात आली. शाहरूख कारागृहाबाहेर येताच त्याच्या १२ ते १५ समर्थकांनी कारागृहाबाहेरच जल्लोष तसेच घोषणाबाजी करीत व्हिडिओ केला. त्यामुळे पोलिस आयुक्तांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

…सिनेस्टाइल पद्धतीने झाली होती अटक

गंभीर गुन्ह्यात शाहरूख हा अनेक महिन्यांपासून फरार होता. त्याची माहिती मिळताच ऑगस्ट २०१७ मध्ये शाहरूखला दोन साथीदारांसह पाथर्डी फाटा परिसरातून शहर पोलिसांनी अटक केली होती. तो राहात असलेल्या पार्वती अपार्टमेंटमध्ये टेरेस, जिन्यात व तळमजल्यावर पोलिसांनी सापळा रचला होता. शेख राहात असलेल्या खोलीच्या गॅलरीत गच्चीवरून कमांडो उतरले होते. सिनेस्टाइल पद्धतीने त्याला अटक करीत त्याच्याकडून दोन देशी बनावटीचे पिस्तूल, 40 जिवंत काडतुसे, पाच मोबाइल व एक क्रमांक नसलेली दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला होता.

हेही वाचा : 

The post नाशिक : 'भाई' जेलमधून सुटल्याने जल्लोष केला तो चांगलाच महागात पडला appeared first on पुढारी.