नाशिक : भावजयीच्या खून प्रकरणी दीराला जन्मठेप

जन्मठेप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

कौटुंबिक कारणातून धारदार शस्त्राने वार करून भावजयीचा खून करणाऱ्या व भावावर प्राणघातक हल्ला करणाऱ्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अनिल पांडुरंग पाटील (३७, रा. मोरे मळा, हनुमानवाडी) असे आरोपीचे नाव आहे. त्याने २ जून २०२० रोजी ज्योती पाटील यांचा खून केला होता.

पाटील कुटुंबीय मोरे मळा परिसरात राहात असताना आरोपी अनिल पाटील हा आई व भावासोबत नेहमी वाद घालत होता. अनिलला मद्य सेवनाचे व्यसन होते तसेच तो कामधंदा करत नसल्याने वाद व्हायचे. तो २ जून २०२० रोजी सायंकाळी कपडे काढून जमिनीवर झोपलेला होता. ज्योती पाटील व अनिलचा भाऊ सुनील पाटील यांनी अनिलला असे वागणे योग्य नाही, असे सांगितले. त्याचा राग आल्याने अनिलने शिवीगाळ करीत किचनमधून चाकू आणला व ज्योती यांच्या छातीत वार केला. वर्मी घाव बसल्याने ज्योती गंभीर जखमी झाल्या. त्यांना वाचवण्यासाठी सुनील यांनी प्रयत्न केला असता, अनिलने त्यांच्यावरही हल्ला केला. त्यात सुनील जखमी झाले. घटनेनंतर अनिल फरार झाला होता. या प्रकरणी सुनीलच्या फिर्यादीनुसार, पंचवटी पोलिस ठाण्यात अनिलविरोधात खून, खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला.

तत्कालीन पोलिस निरीक्षक अशोक भगत व ए. एस. साखरे यांनी तपास करीत अनिलला पकडले व न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे ॲड. दीपशिखा भिडे यांनी युक्तिवाद करीत १३ साक्षीदार तपासले. त्यात परिस्थितीजन्य पुरावे व साक्षीदारांआधारे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांनी अनिलला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

हेही वाचा : 

The post नाशिक : भावजयीच्या खून प्रकरणी दीराला जन्मठेप appeared first on पुढारी.