नाशिक : भूखंड हडपल्याप्रकरणी वकिलासह सहा जणांवर गुन्हा

भूखंड www.pudhari.news

सिडको (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

मृत व्यक्तीचा वडाळा येथील भूखंड बनावट व्यक्ती उभी करून हडपल्याप्रकरणी अ‍ॅड. दीपक वाडिलेसह सहा जणांविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल होताच अ‍ॅड. वाडिले फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत असल्याची माहिती तपासी पोलिस अधिकारी संदीप पवार यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकांत गोरे यांचा ११ वर्षांपूर्वी मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी गोरे यांनी त्यांच्या काही मित्रांसोबत वडाळा गावात भूखंड खरेदी केला होता. या भूखंडाचा रस्त्याचा हिस्सा महापालिकेच्या नावे करण्याची प्रक्रिया अद्याप बाकी होती. या भूखंडांना कुणीच वाली नसल्याने वडाळा गावातील संशयित वसिम जावेद खान, मुदतसर जाकीर सय्यद, इरफान सिरोजोद्दिन सय्यद, मोहम्मद अस्लम वारसी यांनी 2021 मध्ये सिन्नर येथील तत्कालीन दुय्यम निबंधक सुधाकर मोरे आणि कळवणचे तत्कालीन दुय्यम निबंधक योगेश खैरनार यांच्या कार्यालयात बनावट व्यक्तीला उभे करून मुखत्यार पत्र तयार केले. या मुखत्यार पत्राच्या आधारे दुय्यम निबंधक राजू शिंदे यांच्या कार्यालयात त्याचे खरेदीखत नोंदविले. हे प्रकरण संशयास्पद असतानाही दुय्यम निबंधकांनी हे दस्त नोंदवून दिल्याबद्दल पोलिस कसून चौकशी करीत आहेत.

चौकशीदरम्यान संपूर्ण बनावट दस्त दीपक वाडिले या वकिलाने केल्याचे समोर आले आहे. अंबड पोलिसांनी वाडिले यांच्यासोबत संशयित ऋषिकेष जाधव, तुषार दोंदे, शाहरुख शेख, शहादाब शेख, सद्दाम शेख, श्याम देवडे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा आणि अफरातफरीचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच दीपक वाडिले यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. परंतु, प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्याने वाडिले फरार झाल्याचे बोलले जात आहे.

वडाळा येथील जमिनीचे बनावट दस्त तयार करून ते बेकायदा नोंदविल्याप्रकरणी दीपक वाडिलेसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वाडिले वकील असून, ते फरार आहेत. परंतु, लवकरच अटक करण्यात येईल.

– संदीप पवार, पोलिस उपनिरीक्षक, अंबड

हेही वाचा :

The post नाशिक : भूखंड हडपल्याप्रकरणी वकिलासह सहा जणांवर गुन्हा appeared first on पुढारी.