नाशिक : मजूर फेडरेशनच्या 12 संचालकांचे आज ठरणार भवितव्य

मजूर फेडरेशन,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक जिल्हा मजूर संस्थांचा संघ फेडरेशनच्या संचालकपदांसाठी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीचे मतदान रविवारी (दि.२५) पार पडले. क्रांतिवीर व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयातील १४ मतदान केंद्रांवर पार पडलेल्या निवडणुकीत ९६.७३ टक्के मतदान झाले. मतमोजणी सोमवारी (दि.२६) सकाळी ८ पासून द्वारका येथील काशीमाळी मंगल कार्यालयात होणार असल्याची माहीती निवडणूक निर्णय अधिकारी सुरेश महंत यांनी दिली.

एकूण १,०८२ मतदारांपैकी १,०४७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये येवला, सिन्नर, चांदवड, त्र्यंबक, पेठ आणि सुरगाणा या तालुक्यांतून १०० टक्के मतदान झाले. मजूर फेडरेशनच्या २२ संचालकपदांपैकी ८ तालुका संचालकपदांवर बिनविरोध निवड झाली आहे. उर्वरित ७ तालुका संचालक आणि ५ जिल्हास्तरीय संचालक अशा एकूण १२ जागांसाठी ३६ उमेदवार रिंगणात होते.

मतदान प्रक्रियेदरम्यान उमेदवारांनी तसेच मतदारांनी मतदानप्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी सहकार्य केले. सरकारवाडा पोलिसांतर्फे बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर.पी. गायकवाड यांनी काम पाहिले तर त्यांना संजय लोळगे, संजय बडवर यांनी सहकार्य केले. मतदान व मतमोजणीसाठी शंभर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

तालुकानिहाय मतदान :

नाशिक (243/247), मालेगाव (108/111), दिंडोरी (54/56), इगतपुरी (49/53), त्र्यंबकेश्वर (28/28), सिन्नर (63/63), येवला (89/89), सटाणा (90/95), निफाड (100/108), देवळा (45/46), चांदवड (56/56), कळवण (44/45), सुरगाणा (20/20), नांदगाव (47/54), पेठ (11/11).

एकूण 1047/1082

हेही वाचा :

The post नाशिक : मजूर फेडरेशनच्या 12 संचालकांचे आज ठरणार भवितव्य appeared first on पुढारी.