नाशिक : शंकर महादेवन यांच्या गाण्यांनी खान्देश महोत्सवाची सांगता

खान्देश महोत्सवाची सांगता,www.pudhari.news

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

खान्देश महोत्सवाने खानदेश संस्कृतीचे जतन केले आहे. या महोत्सवातून खानदेश संस्कृती व परंपरांचे दर्शन झाले आहे. यानंतरही हा उत्सव अविरत सुरू राहील. पुढील वर्षीही या उत्सवाला मी वेळ काढून येईल. नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात खानदेशी लोक राहत असल्याने त्यांनी स्वतःचे वेगळेपण जपले असल्याचे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

नाशिकमध्ये सुरू असलेल्या खानदेश महोत्सवाच्या खानदेशरत्न पुरस्कार वितरणप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी आयोजक आमदार सीमा हिरे यांनी प्रास्तविक केले. व्यासपीठावर ना. गिरीश महाजन, आमदार देवयानी फरांदे, भाजपा नेते महेश हिरे, रश्मी हिरे-बेंडाळे, भाजपा नेते लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष गिरीश पालवे, माजी महापौर सतीश कुलकर्णी, विजय चौधरी, बाळासाहेब सानप, मनपा आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, हिमगौरी आडके, केदा आहेर आदींसह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, आगामी काळात कोरोनाच्या नवीन विषाणूशी लढण्यासाठी काळजी घ्या. पुढची लाट येऊ नये, यासाठी सतर्क राहण्याचे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, कार्यक्रमासाठी झालेली गर्दी आणि सिटी सेंटर मॉलजवळील वाहनांमुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. याचा फटका मंत्र्यांच्या वाहनांच्या ताफ्यालाही बसल्याने कार्यक्रमस्थळी येण्यास त्यांना उशीर झाला होता.

नाशिककरांची तुफान गर्दी

खानदेश महोत्सवात प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांची उपस्थिती असल्यामुळे गाणे ऐकण्यासाठी नाशिककरांची तुफान गर्दी लोटली होती. शंकर महादेवन यांनी सादर केलेल्या गाण्यांना रसिकांनी भरभरून दाद दिली. खानदेश महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी नागरिकांनी मनसोक्त आनंद घेतला. यावेळी सादर झालेल्या ओंकार गणपती, सूर निरागस हो, जय जय राम कृष्ण हरी आदी अनेक गाण्यांवर नाशिकरांनी फेर धरला.

खानदेशरत्न पुरस्कार

यावेळी खानदेशरत्न पुरस्काराचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. विविध क्षेत्रातील आदर्श व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला. खानदेशरत्न पुरस्काराचे मानकरी विशेष पुरस्कारासाठी गुजरातचे भाजपा प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील यांच्यासह राज्य उत्पादन शुल्क आयुक्त विजय सूर्यवंशी, दिलीप कोठावदे, संस्कृती नाशिक पहाट पाडवाचे प्रणेते शाहू खैरे, आदर्श शिक्षिका कुंदा बच्छाव-शिंदे, कामगार ते यशस्वी उद्योजक बुधाजी पानसरे, उद्योजक मनोज कोतकर, रणजी क्रिकेटपटू सत्यजीत बच्छाव, अपंग संघटनेचे बाळासाहेब घुगे, निरुपणकार संजय धोंडगे महाराज, बहुभाषिक गायिका रायमा रज्जाक शेख (पिहू) व युनायटेड वुई स्टँड एनजीओ सागर मटाले यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

राऊत-ठाकरे राष्ट्रवादी-काँग्रेसच्या मांडीवर

संत तुकाराम महाराज यांच्याविषयी सुषमा अंधारे यांनी केलेल्या वक्तव्याचा भाजप निषेध करणार का, असा प्रश्न उपस्थित केला असता त्यांना योग्यवेळी महाराष्ट्राची जनता योग्य उत्तर देईल, असे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी पत्रकारांना सांगितले. संजय राऊत असो की उद्धव ठाकरे हे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मांडीवर बसलेले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. साडेतीन हजारांच्यावर सरपंच हे भाजप व शिंदे सरकारच्या नेतृत्वाखाली निवडणूक आले आहेत. तत्कालिन सरकारने काहीही कारण नसताना त्यावेळी १२ आमदार निलंबित केले. महाविकास आघाडी सरकारने हुकूमशाही केली. आता जयंत पाटील यांच्या निलंबनाबाबत विधानसभा अध्यक्षांनी घेतलेला निर्णय योग्यच असल्याचे बावनकुळे म्हणाले.

हेही वाचा :

The post नाशिक : शंकर महादेवन यांच्या गाण्यांनी खान्देश महोत्सवाची सांगता appeared first on पुढारी.