नाशिक : मतदानासाठी लागणार 500 बसेस, जुळवाजुळव सुरु

लालपरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान केंद्रापर्यंत अधिकारी, कर्मचारी व मतदान साहित्याची वाहतूक करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसची मदत घेतली जाणार आहे. पंधराही तालुक्यांत जवळपास ४५० ते ५०० बसेसची आवश्यकता भासणार आहे. त्यादृष्टीने तहसीलस्तरावरून संबंधित आगारप्रमुखांशी पत्रव्यवहार सुरू करण्यात आला आहे.

देशभरात सध्या लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार शिगेला पोहोचला आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, दिंडोरी तसेच धुळे – मालेगाव या मतदारसंघांकरिता २० मे रोजी मतदानाचा टप्पा पार पडणार आहे. त्याकरिता जिल्ह्यात ४ हजार ८०० मतदान केंद्रे अंतिम करण्यात आली आहेत. मतदान प्रक्रियेसाठी ३० हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जात आहे. हे सर्व कर्मचारी मतदानाच्या एक दिवस आधी म्हणजे १९ मे रोजी ईव्हीएम-व्हीव्हीपॅट व मतदान साहित्यासह केंद्राकडे रवाना होतील. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसगाड्यांची मदत घेतली जाणार आहे.

‘गाव तेथे एसटी’ या उक्तीप्रमाणे प्रत्येक तहसीलदारांना त्यांच्या तालुक्यात आवश्यक बसगाड्यांचे नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहेत. त्यानुसार पंधराही तालुक्यांत सुमारे ४५० ते ५०० बसगाड्या लागणार आहेत. त्यामुळे ऐनवेळी गैरसोय टाळण्यासाठी तहसीलदारांकडून आताच संबंधित तालुक्यातील एसटी आगारप्रमुखांशी संपर्क साधला जात आहे.

खासगी वाहनेही घेणार

जिल्हा प्रशासन लोकसभा मतदानासाठी एसटी महामंडळाच्या बसगाड्यांसोबत खासगी वाहनेही अधिग्रहित करणार आहेत. तसे आदेश प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाला देण्यात आले आहेत. खासगी वाहनांमध्ये कार, जीप, काळीपिवळी, मिनी ट्रक्स, बंदिस्त ट्रकचा समावेश आहे.

हेही वाचा –

The post नाशिक : मतदानासाठी लागणार 500 बसेस, जुळवाजुळव सुरु appeared first on पुढारी.