नाशिक : मध्यरात्री दीड वाजता दिली बदलीची ऑर्डर

Police

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पोलिस आयुक्तालयात गैरव्यवहारांच्या चर्चांना जोर वाढला असून, पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांनी त्यास पुष्टी मिळत आहे. आयुक्तालयातील एका सहायक आयुक्ताकडे नियंत्रण कक्षाची जबाबदारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे बदलीची ऑर्डर मध्यरात्री दीड वाजता संबंधित अधिकाऱ्यास दिल्याने पोलिस वर्तुळात तो चर्चेचा विषय बनला आहे. तर एका पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षकाचा गैरव्यवहार समोर आल्याने त्याच्याकडील सर्व गुन्ह्यांचा तपास इतर अधिकाऱ्यांकडे वर्ग करून संबंधिताची खातेअंतर्गत चौकशी सुरू केल्याचे समोर येत आहे.

गणेशोत्सवाच्या अंतिम टप्प्यात पोलिस आयुक्तालयात अनेक बदल झाले. एका अधिकाऱ्यास मध्यरात्रीतून बदलीची ऑर्डर सोपवून त्यास नियंत्रण कक्षाचा पदभार सोपवण्यात आला. विशेष म्हणजे, या अधिकाऱ्याकडे सर्व पोलिस ठाण्यांसह इतर शाखांचे ‘मॉनिटरिंग’ची जबाबदारी असल्याचे बोलले जाते. मात्र, मॉनिटरिंग करताना गैरव्यवहार केल्याचे आरोप संबंधितावर झाल्याचे समजते. शहरातील सर्व पोलिस ठाण्यांसह इतर शाखांचे मॉनिटरिंग करताना त्यांच्याकडून येणारी आर्थिक रसद संकलित करताना गैरव्यवहार झाल्याचा आरोप काही अधिकाऱ्यांनी केल्याची चर्चा आहे. त्यातून ही बदली झाल्याचे पोलिस वर्तुळात बोलले जात आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांमध्येच आलबेल नसल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, याबाबत ११२ क्रमांकावरील प्रतिसाद जलद व्हावा, यासाठी सहायक आयुक्तांची गरज असल्याचे सांगत ही बदली झाल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, महत्त्वाच्या जबाबदारीतून नियंत्रण कक्षाची जबाबदारी सोपवल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे.

पोलिस निरीक्षक – सहायक आयुक्तांमध्येही तू तू मै मै

गणेश विसर्जनापूर्वी भद्रकाली पोलिस ठाण्यात पोलिसांची बैठक झाली. बैठकीनंतर अधिकारी गप्पा मारत असताना उच्चभ्रू वस्ती असलेल्या पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक व सहायक आयुक्तांचे मतभेद झाल्याची चर्चा आहे. पोलिस ठाण्यांतील आर्थिक मुद्द्यात सहायकांनी लक्ष घालत निरीक्षकांना नियंत्रण कक्षात बदली करण्याचा दम भरल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे संबंधित निरीक्षकाने ‘मीच स्वत:हून जातो’ म्हणत राग व्यक्त केला. त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये सुसंवाद नसल्याचे बोलले गेले.

नामधारी निरीक्षक

शहरातील एका पोलिस ठाण्यातील गुन्हे निरीक्षकाने एका उद्योजकाकडून पैशांसह काही चैनीच्या वस्तू घेतल्याचे बोलले जात आहे. तसेच उद्योजकाच्या कंपनीत ठेकाही घेतल्याचे समजते. त्यामुळे संबंधित निरीक्षकाचीही खातेअंतर्गत चौकशी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. वरिष्ठांनी या अधिकाऱ्याकडील सर्व गुन्ह्यांचा तपास इतर अधिकाऱ्यांकडे सोपवला असून, अद्याप नवीन जबाबदारीही दिली नसल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : मध्यरात्री दीड वाजता दिली बदलीची ऑर्डर appeared first on पुढारी.