नाशिक : मनपाच्या पाणीपुरवठा योजनेला जीवन प्राधिकरणाची हरकत

पाणी पुरवठा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

केंद्र शासनाच्या अमृत २ अभियानांतर्गत महापालिकेने तयार केलेल्या ३५० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेच्या प्रस्तावास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने आक्षेप नोंदविला आहे. योजनेचा आराखडा बनवताना २०४१ पर्यंतच्या संभाव्य लोकसंख्येचा आधार मनपाने घेतला आहे. मात्र, त्यावरच जीवन प्राधिकरणाने हरकत घेतली आहे. त्यामुळे या आक्षेपांचे निराकरण करून तिसऱ्यांदा सुधारित आराखडा सादर करण्याची तयारी महापालिकेने केली आहे.

नाशिक शहरासह नवीन कॉलनीतील जलवाहिन्यांसाठी अमृत १ अभियानातून निधी देण्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले होते. त्यानुसार मनपाने २५० कोटींचा आराखडा राज्य शासनाला सादर करण्यात आला होता. शासनाने आराखडा जीवन प्राधिकरणाकडे तपासणीकरिता पाठविला होता. त्यात काही सुधारणा सुचविल्यानंतर मनपाने २२६ कोटींचा सुधारित आराखडा तयार करत मजिप्राला सादर केला होता. मात्र, मजिप्राच्या मान्यतेने केंद्र शासनाकडे आराखडा जाईपर्यंत अमृत १ अभियानातील केंद्राचा महाराष्ट्राच्या हिश्श्याचा निधी संपुष्टात आला होता. त्यामुळे गेल्या चार वर्षांपासून नाशिक महापालिकेचा पाणीपुरवठा याेजनेचा प्रस्ताव लटकून पडला होता. कोरोनानंतर शासनाकडे या प्रस्तावाबाबत पाठपुरावा झाल्यानंतर महापालिकेने पाणीपुरवठा योजनेसाठी केंद्राच्या अमृत २ योजनेअंतर्गत आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठा विभागाने ३५० कोटींचा सुधारित प्रस्ताव राज्य शासनास सादर केला होता. प्रस्ताव तपासणीकरिता जीवन प्राधिकरणाकडे सादर करण्यात आला. परंतु, या लोकसंख्येच्या निकषावरच मजिप्राने आक्षेप घेतला असून, अन्य काही आक्षेपही नोंदविले आहेत.

प्रकल्प सल्लागाराची होणार नियुक्ती

शहर पाणीपुरवठा योजनेसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार संस्थेची नियुक्ती करण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. योजनेवर मजिप्रानेच आक्षेप नोंदविल्याने आता तिसऱ्यांदा अहवाल तयार करून तो मजिप्राकडे तांत्रिक तपासणीकरिता सादर केला जाणार आहे. यात कालावधी जाणार असल्याने प्रकल्पाची किंमत पुन्हा वाढणार आहे. सध्या ३५० कोटी इतकी प्रकल्प किंमत आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : मनपाच्या पाणीपुरवठा योजनेला जीवन प्राधिकरणाची हरकत appeared first on पुढारी.