नाशिक : मनपा कर्मचार्‍यांची दिवाळी होणार गोड, आयुक्तांनी घेतला ‘हा’ निर्णय

नाशिक मनपा,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसतानाही मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी कर्मचार्‍यांसाठी दिवाळीनिमित्त 15 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षी
15 हजारांचेच अनुदान अदा करण्यात आले होते.

मनपाचे कायम कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी यांना प्रत्येकी 15 हजार रुपये, तर एनयूएलएमसारख्या शासनाच्या अनुदानातून चालणार्‍या योजनांमधील मानधनावर नेमणूक असलेल्या कर्मचार्‍यांना प्रत्येकी 7,500 रुपये सानुग्रह अनुदान अदा केले जाणार आहे. यासंदर्भातील प्रस्तावास येत्या आठवडाभरात महासभेची मंजुरी घेतली जाईल आणि दिवाळीपूर्वी अनुदानाची रक्कम कर्मचार्‍यांच्या बँक खात्यात जमा होईल.

मनपातील कर्मचारी संघटनांनी दिवाळीनिमित्त कर्मचार्‍यांना 21 ते 30 हजार रुपये सानुग्रह अनुदान अदा करण्याची मागणी केली आहे. मात्र, कोरोना महामारीमुळे आर्थिक स्थिती फारशी चांगली नसल्याने मागील वर्षाप्रमाणेच अनुदान देण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. सानुग्रह अनुदानाबरोबरच नियमित वेतनासह सातव्या वेतन आयोगाच्या फरकापोटीदेखील रक्कम अदा करावी लागली आहे. दिवाळीमुळे ऑक्टोबरचे वेतनही याच महिन्यात अदा करावे लागणार आहे.

पावणेदहा कोटींचा बोजा
महापलिकेच्या 6,120 कायम कर्मचारी तसेच अंगणवाडी मुख्य सेविका, सेविका आणि मदतनीस यांना प्रत्येकी 15 हजार, तर शासन योजनांमध्ये काम करणार्‍या मानधनावरील 489 कर्मचार्‍यांना 7,500 रुपये सानुग्रह दिले जाणार आहे. सानुग्रह अनुदानामुळे महापालिकेवर 9 कोटी 80 लाख रुपयांचा बोजा पडणार आहे. यासंदर्भातील तरतूद अंदाजपत्रकात केलेली आहे.

मनपाच्या कायम तसेच शासन योजनेत मानधनावर काम करत असलेल्या कर्मचार्‍यांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला असून, येत्या महासभेत त्यास मंजुरी देऊन कर्मचार्‍यांना दिवाळीपूर्वी सानुग्रह अनुदान अदा केले जाईल.
– डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, आयुक्त तथा प्रशासक

हेही वाचा :

The post नाशिक : मनपा कर्मचार्‍यांची दिवाळी होणार गोड, आयुक्तांनी घेतला 'हा' निर्णय appeared first on पुढारी.