नाशिक मनपा : प्रारूप याद्यांवरील 834 हरकती फेटाळल्या

नाशिक मनपा,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
प्रारूप प्रभागनिहाय मतदारयाद्या अंतिम करताना महापालिकेकडे 3,847 इतक्या मोठ्या प्रमाणावर हरकती प्राप्त झाल्या होत्या. या हरकतींपैकी 2,877 हरकती पूर्णत: तर 136 हरकती अंशत: स्वीकृत करण्यात आल्या आहेत. तर 834 हरकती मनपाच्या निवडणूक विभागाने फेटाळल्या, अशी माहिती मनपा प्रशासन उपआयुक्त तथा निवडणूक विभागाचे समन्वयक मनोज घोडे-पाटील यांनी दिली.

प्रारूप मतदारयाद्यांवर मागविण्यात आलेल्या 3,847 इतक्या हरकतीची छाननी तसेच स्थळ पाहणी केल्यानंतर मनपा निवडणूक शाखेच्या कर्मचार्‍यांनी तसेच अधिकार्‍यांनी सलग तीन ते चार दिवसरात्र काम करून अंतिम मतदारयाद्या 21 जुलै रोजी प्रसिद्ध केल्या. मुख्यालय राजीव गांधी भवनासह सहाही विभागीय कार्यालयांमध्ये तसेच मनपाच्या संकेतस्थळावरही मतदारयाद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. अंतिम मतदारयाद्यांनुसार महापालिका निवडणुकीसाठी 12 लाख 372 मतदार आहेत. प्रारूप मतदारयाद्यांवर प्राप्त झालेल्या 3,847 हरकतींपैकी 2,877 हरकती पूर्णत: तर 136 हरकती अंशत: स्वीकृत करून अंतिम मतदारयाद्यांमध्ये दुरुस्ती करण्यात आल्या आहेत. तर 834 हरकतींमध्ये चौकशीअंती कुठलेही तथ्य आढळून न आल्याने या हरकती फेटाळण्यात आल्याचे उपआयुक्त घोडे-पाटील यांनी सांगितले.

सिडको : विभागातून सर्वाधिक 2,630 हरकती प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी 2,007 हरकती पूर्णत: तर 20 अंशत: स्वीकृत करत अंतिम मतदारयाद्यांमध्ये दुरुस्ती करण्यात आली असून, 603 हरकती फेटाळण्यात आल्या आहेत. नाशिक पश्चिम : विभागातून प्राप्त 52 पैकी 23 पूर्णत: 11 अंशत: स्वीकृत केल्या. तर 18 हरकती फेटाळल्या.
नाशिक पूर्व : विभागातील 325 पैकी 221 पूर्णत: 56 अंशत: स्वीकृत 48 हरकती फेटाळण्यात आल्या.
पंचवटी : विभागातील 418 पैकी 320 पूर्णत: 22 अंशत: स्वीकृत तर 76 हरकती फेटाळल्या गेल्या.
सातपूर : विभागातील 1,666 पैकी 111 पूर्णत: तर 27 अंशत: स्वीकृत तर
28 हरकती फेटाळल्या.
नाशिकरोड : विभागातील 250 पैकी 195 पूर्णत: तर 22 अंशत: स्वीकृत तर
33 हरकती फेटाळल्या.

हेही वाचा :

The post नाशिक मनपा : प्रारूप याद्यांवरील 834 हरकती फेटाळल्या appeared first on पुढारी.