नाशिक महापालिकेचे कामकाज ठप्प होणार! हे आहे कारण

नाशिक मनपा www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- सुरूवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा आणि त्यानंतर शहरात आयोजित करण्यात आलेल्या ‘डिप क्लिनिंग’ स्वच्छता मोहिमेत महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी व्यस्त असताना आता येत्या २३ जानेवारीपासून महापालिकेचे कामकाज पूर्णपणे ठप्प होणार आहे. मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सर्वेक्षणाकरीता महापालिकेच्या सफाई कर्मचारी वगळता उर्वरीत सर्वच २६०० कर्मचाऱ्यांची प्रगणक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मराठा योध्दा मनोज जरांगे-पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाची डेडलाईन जवळ येताच राज्य सरकारची धावपळ सुरू झाली आहे. कुणबी नोंदी तपासण्यासाठी माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीला विविध जिल्ह्यांमध्ये ५४ लाख कुणबी नोंदी आढळल्या आहेत. त्या सर्व पात्र कुटुंबांना कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा जातीचे दाखले तातडीने द्यावेत असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. नाशिक जिल्ह्यात २ लाख ८ हजार ४० कुणबी नोंदी आढळल्या आहेत. २० जानेवारीपर्यंत मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावा अन्यथा मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिल्यानंतर शासनाने मराठा समाजाचे मागासलेपण शोधण्यासाठी सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २३ जानेवारीपासून हे सर्वेक्षण सुरू केले जाणार आहे. त्यासंदर्भातील शासनाचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाने शहरी भागात महापालिकेला माहिती गोळा करण्याच्या सुचना दिल्या आहेत. या सर्वेक्षणासाठी महापालिकेचे २६०० कर्मचारी प्रगणक म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. २३ ते ३१ जानेवारी या कालावधीत घरोघरी जावून माहिती संकलित केली जाणार आहे. त्यापुर्वी प्रशिक्षण होईल. २० जानेवारीला अधिकाऱ्यांचे तर, २१ व २२ जानेवारीला प्रगणकांचे प्रशिक्षण होईल. प्रगणकांची संख्या लक्षात घेता महापालिकेचे संपुर्ण कामकाज ठप्प होण्याची भिती आहे.

अंगणवाडी सेविकांची शोधाशोध

सफाई कर्मचारी वगळता जवळपास सर्वच कर्मचाऱ्यांची सर्वेक्षणासाठी नियुक्ती करण्यात आल्याने २३ ते ३१ जानेवारी दरम्यान महापालिकेचे कामकाज ठप्प होणार आहे. त्यामुळे आशा वर्कर व अंगणवाडी सेविकांची मदत घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. परंतू अंगणवाडी सेविका, आशा वर्करही संपावर असल्यामुळे प्रशासनाची अडचण झाली आहे.

सर्वेक्षणात ही माहिती विचारणार

सर्वेक्षणासाठी माहितीपत्रक भरून घेतले जाणार आहेत. एक माहितीपत्रक भरण्यासाठी तब्बल १० मिनिटांचा कालावधी लागणार आहे. या पत्रकावर जवळपास १५० हून अधिक प्रश्‍नावली पर्यायी स्वरुपात आहे. कुटूंबाला शिष्यवृत्ती मिळते का, कुटूंबात वैद्यकीय, इंजिनिअरींग का घेतले नाही, मुलींनी शाळा सोडण्याची कारणे, निवासाचा प्रकार, ग्रामिण की शहरी भागात राहतात, गावाला जाण्यासाठी रस्ते आहेत का, नदी असल्यास त्यावर पुल आहे का, पुर्वजांचे मुळ निवासस्थान, जातीचा पारंपारीक व्यवसाय आदी प्रकारचे प्रश्‍न आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक महापालिकेचे कामकाज ठप्प होणार! हे आहे कारण appeared first on पुढारी.