त्र्यंबकेश्वर : संकेतस्थळ महिनाभरात कार्यान्वित होणार; सुलभ दर्शन

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा
त्र्यंबकेश्वर मंदिरात पूर्व दरवाजा दर्शनबारीने गर्दीच्या कालावधीत भाविकांना 4 ते 5 तास वेळ लागत असल्याने भाविक दर्शनाचा 200 रुपये व्हीआयपी पास खरेदी करतात. मात्र, त्यासाठीदेखील दोन ते तीन तास रांगेत उभे राहावे लागत असते. हा वेळ वाचविण्यासाठी त्र्यंबक देवस्थान ट्रस्टने आता व्हीआयपी पास खरेदी ऑनलाइन माध्यमातून करून देण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. (Trimbakeshwar)

त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) मंदिरात भाविकांची दर्शनासाठीची दररोज होणारी गर्दी लक्षात घेऊन देवस्थान ट्रस्टने आता 200 रुपये व्हीआयपी पासची ऑनलाइन सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी देवस्थान ट्रस्टच्या अधिकृत संकेतस्थळावर https://trimbakeshwartrust.com/ सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे. या संकेतस्थळाला भेट दिल्यास ऑनलाइन व्हीआयपी पासचे काम प्रगतिपथावर असल्याचे दिसून येते. भाविकांना येथे दर्शनासाठी येताना देवस्थान ट्रस्टच्या संकेतस्थळावर जाऊन तेथे 200 रुपये दर्शन पास आरक्षित करता येणार आहे. यामध्ये तारीख आणि विशिष्ट वेळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एका व्यक्तीला 200 रुपये शुल्क आकरण्यात येणार आहे. मात्र, 10 वर्षाखालील बालकांना आणि 65 वर्षाच्या वरील ज्येष्ठ नागरिकांना तसेच दिव्यांग भक्तांना शुल्क माफ आहे. आधारकार्ड अथवा पॅनकार्डच्या आधारे बुकिंग करता येणार आहे. तसेच चार तासांच्या आत बुकिंग रद्द करण्याची सुविधा देण्यात आली आहे. बुकिंग केलेला व्हीआयपी पास डाउनलोड करता येणार आहे. तसेच प्रत्येक भाविकासाठी स्वतंत्र क्यूआर कोड असलेला हा व्हीआयपी पास हस्तांतरणीय नसेल.

शहरात तीन ठिकाणी व्हीआयपी पास काउंटर
भाविकांना 200 रुपये पास घेऊन दर्शनाची इच्छा असल्यास त्यासाठी त्र्यंबकेश्वर मंदिर (Trimbakeshwar) उत्तर दरवाजाच्या समोर कुशावर्त तीर्थ आणि वाहनतळाच्या जवळ असलेले शिवप्रसाद भक्तनिवास या तीन ठिकाणी व्हीआयपी पास घेता येणार आहे. त्यासाठी भक्तांना आधारकार्ड, पॅनकार्ड ओळखपत्र म्हणून सादर करावे लागणार आहे. त्याचसोबत बायोमेट्रिक बोटांचे ठसे, चेहऱ्याचे स्कॅनिंग करावे लागेल. त्यानंतर त्यांना बारकोड असलेला पास देण्यात येईल.

हजारो किलोमीटर अंतरावरून आलेल्या भक्तांचे परतीचे नियोजन असल्याने अनेकदा गर्दीमुळे दर्शन न घेता माघारी जावे लागते. दर्शनासाठी लागणारा वेळ पाहता भाविक पैसे मोजण्याची तयारी ठेवतो. तातडीचे दर्शन घडवून देण्याचा व्यवसाय होत असल्याची चर्चा होत असते, तर कधी तिकिटांचा काळाबाजार झाला अशी बोंबाबोंब होते. या सर्वांना ऑनलाइन तिकीट पद्धतीने चाप बसेल, अशी अपेक्षा येथे व्यक्त होत आहे. त्याच सोबत भक्तांना दर्शनाचे नियोजन अगोदर करता येणार आहे. लवकरच ही सुविधा कार्यान्वित होणार असल्याचे विश्वस्तांनी स्पष्ट केले आहे. याचबरोबर शिवप्रसाद भक्तनिवासात रूमचे बुकिंग, लघु रुद्र आणि रुद्राभिषेक पूजा बुकिंग याही सुविधा संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

भाविकांच्या सुविधेसाठी ऑनलाइन व्हीआयपी पास बुकिंगसह अन्य सुविधा सुरू करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. त्यासाठीचे संगणकीय काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच या सुविधा सुरू होतील. – रूपाली भुतडा, विश्वस्त, त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट.

हेही वाचा:

The post त्र्यंबकेश्वर : संकेतस्थळ महिनाभरात कार्यान्वित होणार; सुलभ दर्शन appeared first on पुढारी.