महावितरणला रस्त्यावर पोल उभारण्यासाठी लागणार परवानगी

महावितरण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– रस्त्याच्या रुंदीची माहिती न घेता महावितरणमार्फत उभारल्या जाणाऱ्या पथदीप पोल, कन्डक्टर, ट्रान्सफार्मर, मिनी पिलरमुळे रस्ता रुंदीकरण करताना महापालिकेला आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे यापुढील काळात रस्त्यालगत पोल, कन्डक्टर, ट्रान्सफार्मर, मिनी पिलरची उभारणी करताना महावितरणला आता महापालिकेच्या नगरनियोजन विभागाची पुर्वपरवानगी घ्यावी लागणार आहे. नगरनियोजन विभागाकडून डिमार्केशन करून घेतल्यानंतरच महावितरणला आता पुढील कार्यवाही करता येणार आहे.

महापालिका हद्दीत विविध ठिकाणी नव्याने विकसित होणाऱ्या परिसरात महावितरण कंपनीमार्फत पोल, ट्रान्सफार्मर, मिनी पिलर रस्त्यात, विविध चौकात, फॅनिंगमध्ये उभारली जातात. यासाठी महापालिकेची कुठलीही परवानगी घेतली जात नाही. सदर ठिकाणी लोकवस्ती झाल्यानंतर वाहतुकीची वर्दळ वाढते. अशावेळी महावितरणने रस्त्यात फॅनिंगमध्ये उभारलेल्या पथदीप पोल, ट्रान्सफार्मर, कन्डक्टर आदींमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. रस्त्याची पुरेशी रुंदी माहिती करून न घेता उभारलेले पथदीप पोल, ट्रान्सफार्मर रस्ता रुंदीकरण करताना अडथळा ठरतात. त्यामुळे अपघात वाढतात. त्यामुळे रस्त्यावर उभारण्यात आलेले वाहतुकीस अडथळा ठरणारे पथदीप पोल, ट्रान्सफार्मर, कन्डक्टर हटविण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि नागरीकांकडून मागणी होत असते. यासंदर्भात महावितरणकडून कुठलीही कार्यवाही केली जात नाही. त्यामुळे सदरचे पोल, ट्रान्सफार्मर, मिनी पिलर महापालिकेला स्वखर्चाने स्थलांतरीत करावे लागतात. त्याकरीता महावितरणला १.३ टक्के सुपरव्हिजन चार्जेस देखील अदा करावे लागतात. यामुळे महापालिकेला आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे. यासंदर्भात महावितरण कंपनीला वेळोवेळी कळवून देखील त्याची दखल घेतली जात नसल्याचे महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे महापालिकेने यासंदर्भात आता कठोर धोरण अंगीकारले आहे. यापुढील काळात महापालिका हद्दीत रस्त्यालगत कुठलेही पोल, कन्डक्टर, ट्रान्सफार्मर, मिनी पिलरची उभारणी करावयाची असल्यास महावितरणला महापालिकेची पूर्वपरवानगी घ्यावी लागणार आहे. नगरनियोजन विभागाकडून रस्त्याच्या क्षेत्राचे डिमार्केशन करून घेतल्यानंतरच पुढील कार्यवाही करण्याची परवानगी महावितरणला असणार आहे.

हेही  वाचा :

The post महावितरणला रस्त्यावर पोल उभारण्यासाठी लागणार परवानगी appeared first on पुढारी.