नाशिक : मोगरे खून प्रकरणातील मास्टरमाइंडला पोलिस कोठडी

पोलिस कोठडी,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अंबड येथील कंपनी व्यवस्थापक याेगेश माेगरे यांच्या खून प्रकरणात अटक केलेला मुख्य संशयित अजितसिंग सत्यवान लठवाल (२४, रा. राज्य हरियाणा) याने शेअर बाजारात गुंतवणुकीत झालेला तोटा भरून काढण्यासाठी मुंबईत श्रीमंत व्यक्तीचे अपहरण करीत चोरीचा बेत आखल्याची धक्कादायक कबुली पोलिसांना चौकशीत दिली.

अंबड एमआयडीसीतील रोहिणी इंडस्ट्रिजचे व्यवस्थापक योगेश मोगरे (रा. इंदिरानगर) यांचा २३ मार्चला रात्री दोघा मारेकऱ्यांनी खून केला. त्यानंतर मारेकऱ्यांनी मोगरे यांची कार (एमएच १५, एचव्हाय ४९५९) चोरून नेली. या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे शाखेने सुरुवातीस १७ वर्षीय अल्पवयीन संशयितास पकडले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत मुंबईत एखाद्या व्यक्तीचे अपहरण करून खंडणी मागण्यासाठी कार चोरताना मोगरे यांचा खून केल्याची कबुली त्याने दिली होती. त्यानंतर पोलिसांनी हरियाणामधून अजितसिंग यास पकडले. चौकशीत त्याने परदेशात एमबीएचे शिक्षण घेतल्याचे उघड झाले.

मात्र, शिक्षण अर्धवट साेडून ताे पुन्हा हरियाणात आला. शेअर बाजारात नुकसान झाल्याने त्यास लाखो रुपयांचा फटका बसला. त्याच्या भरपाईसाठी त्याने मुंबईत श्रीमंत व्यक्तीचे अपहरण करून खंडणी मागण्याचा कट रचला होता. मात्र, त्या आधी त्याने कार चोरताना मोगरे यांचा खून केला. लठवालला न्यायालयाने सोमवारपर्यंत (दि.१०) पाेलिस काेठडी सुनावली आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : मोगरे खून प्रकरणातील मास्टरमाइंडला पोलिस कोठडी appeared first on पुढारी.