नाशिक : यंदा अल निनोचा धोका; आजच करणार पाणीपुरवठ्याचे नियोजन

गंगापूर धरण www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अल निनोमुळे होणाऱ्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी करावयाच्या उपाययोजनेसंदर्भात मंगळवारी (दि.२८) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीला स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी उपस्थित राहणार असून, नाशिक मनपाच्या अधिकाऱ्यांनाही तसे सूचित करण्यात आले आहे.

नाशिक शहराला गंगापूर धरण समूह तसेच मुकणे आणि दारणा धरणातून दररोजचा पाणीपुरवठा केला जातो. त्यातही गंगापूर आणि मुकणे या दोन धरणांवर शहराचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. आजमितीस गंगापूर धरण समूहात ६२ टक्के इतका पाणीसाठा आहे. मागील वर्षी हाच पाणीसाठा ५७ टक्के होता. धरणात समाधानकारक पाणीसाठा असला तरी यंदा अल निनोचा वर्तविण्यात आलेला धोका पाहता दुष्काळ पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे केंद्र व राज्य शासनाने पाणीसाठा जपून वापरण्याचे आवाहन करत उपाययोजना करण्याचे निर्देश स्थानिक स्वराज्य संस्थांना तसेच जलसंपदा विभागाला दिले आहेत. यामुळे पाण्याचा आतापासूनच काटकसरीने वापर करावा लागणार आहे. यासंदर्भात मंगळवारी (दि.२८) राज्य शासनाने व्हीसीद्वारे बैठकीचे आयोजन केले असून, राज्याचे मु्ख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव हे बैठक घेणार आहेत.

दरवर्षी नाशिक महापालिकेकडून जुलैअखेरपर्यंत पाण्याचे नियोजन केले जाते. परंतुु, यंदा अल निनोमुळे निर्माण होणारा धाेका लक्षात घेता जुलै महिन्याऐवजी ऑगस्ट महिनाअखेरपर्यंत पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. त्याचबरोबर पाणी आणि इतर स्वरूपाच्या आरक्षणाबाबतही नियोजन करण्यात येणार असल्याचे मनपा प्रशासनातील सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा :

The post नाशिक : यंदा अल निनोचा धोका; आजच करणार पाणीपुरवठ्याचे नियोजन appeared first on पुढारी.