नाशिक : राज्यपालांनी घेतला आढावा : विद्यार्थ्यांकडेही वेधले लक्ष

आदिवासी विकास विभाग www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्यातल्या आदिवासी बांधवांसाठी आदिवासी विकास विभाग सतत कार्यशील असतो. आदिवासी विद्यार्थ्यांचे गुणवत्तापूर्ण शिक्षण तसेच सर्वच आदिवासी बांधवांचे आरोग्य, जीवनकौशल्य यासाठी विविध उपक्रम आदिवासी विकास विभागाकडून राबविले जातात. मागील तीन वर्षांतील राबविलेले विविध उपक्रम आणि योजनांचा राजभवन येथील बैठकीत महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी नुकताच आढावा घेतला.

आदिवासी विकास विभागांतर्गत आयुक्तालयासह ठाणे, नाशिक, अमरावती व नागपूर येथे चार अपर आयुक्त व ३० एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालये असून, त्यांच्यामार्फत गुणवत्तापूर्ण शिक्षण तसेच कल्याणच्या राज्य व केंद्र शासनाच्या योजनांची अंमलबजावणी केली जाते. तर आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत आदिवासी रूढी, परंपरा, संस्कृती व समाजावर संशोधन तसेच विविध प्रशिक्षणे आणि अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्यांवर सनियंत्रण हे कामकाज आहे. आदिवासी विकास वित्त महामंडळाकडून रोजगार, स्वयंरोजगार, खावटी कर्ज योजना तसेच गौण वनोपज खरेदी-विक्री आदी काम होत असल्याची माहिती राज्यपालांना देण्यात आली. आदिवासी विकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीपकुमार व्यास यांनी राज्यपाल महोदयांसमोर सादरीकरण केले. यावेळी आयुक्त नयना गुंडे, आदिवासी विकास वित्त महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, उपसचिव विजेंद्रसिंग वसावे, मच्छिंद्र शेळके, रवींद्र जाधव, मुख्य अभियंता विकास रामगुडे आदी उपस्थित होते.

…हे विषय मांडले
आदिवासी जमातींची संख्या, विभागाची रचना व खर्चाचे नियोजन, आश्रमशाळा/वसतिगृहे व तेथील विद्यार्थी संख्या-शिक्षण आणि आरोग्य, मध्यवर्ती स्वयंपाकगृह, विविध शिष्यवृत्ती, वनहक्के दावे, रोजगारनिर्मिती, आदिवासी मातांचे आरोग्य आणि त्यांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधा, रस्त्यांचे बांधकाम, आदिम जमातीच्या आदिवासी बांधवांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना आदी विषय मांडण्यात आले. तर विविध योजनांची अंमलबजावणी करताना येणाऱ्या समस्यांकडे राज्यपालांचे लक्ष वेधण्यात आले.

हेही वाचा:

The post नाशिक : राज्यपालांनी घेतला आढावा : विद्यार्थ्यांकडेही वेधले लक्ष appeared first on पुढारी.