नाशिक : रिक्षा प्रवासात वृद्धाकडील पाच लाखांची रोकड लंपास

चोरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

रिक्षाने प्रवास करणाऱ्या ७९ वर्षीय वृद्ध व्यक्तीकडील पाच लाख रुपयांची रोकड चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीकृष्ण लक्ष्मणराव झुंजारराव (७९, रा. हिंजवडी, जि. पुणे) हे बुधवारी (दि.९) नाशिकमध्ये होते. सकाळी १०.१५ च्या सुमारास ते गडकरी चौक येथून रिक्षात बसले. त्यावेळी त्यांच्याजवळील सुटकेसमध्ये पाच लाख रुपयांची रोकड होती. गोविंदनगर येथे उतरल्यानंतर बॅगेतील रोकड लंपास झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे झुंजारराव यांनी मुंबई नाका पोलिस ठाणे गाठून चोरट्याविरोधात चोरीची फिर्याद दाखल केली आहे. रिक्षातील सहप्रवाशाने चोरी केल्याचा संशय झुंजारराव यांनी व्यक्त केल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : रिक्षा प्रवासात वृद्धाकडील पाच लाखांची रोकड लंपास appeared first on पुढारी.