नाशिक: लोहोणेर येथील गिरणा नदीपात्रात ड्रग शोधण्यासाठी मुंबई पोलीस दाखल

Lohoner

देवळा; पुढारी वृत्तसेवा : लोहोणेर येथील गिरणा नदीपात्रात ड्रग शोधण्यासाठी मुंबई पोलीस आज (दि. २९) पुन्हा दाखल झाले आहेत. साकी नाका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश शिंदेसह पथकाने लोहोणेर येथील स्थानिक पोहणाऱ्यांच्या मदतीने गिरणा नदीत ड्रग शोधमोहीम सुरू केली आहे. नदीला पाणी कमी झाल्याने ही शोध मोहीम पुन्हा सुरू केल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली.

याकामी पोलिसांनी स्थानिक नागरिकांची मदत घेतली आहे. त्यांच्या हाती काही मिळून येते का याची उत्सुकता लागून आहे. ड्रग्ज माफिया ललित पाटील याचा साथीदार चालक संशयित सचिन वाघ याला अटक करून त्याची चौकशी केली असता देवळा तालुक्यातील सरस्वतीवाडी येथे ड्रग्ज लपवल्याची त्याने कबुली दिली होती. तसेच लोहोणेर येथील गिरणा नदी पत्रात ड्रग्ज नष्ट केल्याचे त्याने सांगितले होते.

दरम्यान, सरस्वतीवाडी येथील टेकडीवर असलेल्या झुडपांमध्ये खड्डा खोदून त्यात कोट्यवधींचे ड्रग्ज पुरल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मंगळवारी (दि. २४) साकी नाका पोलिसांनी येथे धाड टाकून वाघ याच्या दुसऱ्या साथीदाराकडून तेरा ते चौदा किलो ड्रग्ज जप्त केले होते. ललित पाटील यांचा चालक सचिन वाघ हा देवळा तालुक्यातील वाखारी पिंपळगाव येथील रहिवासी आहे.

हेही वाचा 

The post नाशिक: लोहोणेर येथील गिरणा नदीपात्रात ड्रग शोधण्यासाठी मुंबई पोलीस दाखल appeared first on पुढारी.