नाशिक : वनजमिनीवरील बेकायदेशीर सौरऊर्जा प्रकल्प सील

उर्जा प्रकल्प सील,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नांदगाव तालुक्यातील डॉक्टरवाडी व पांझण येथील वनजमिनीवर बेकायदा उभारण्यात आलेला सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प मंगळवारी (दि.२७) वनविभागाने सील केला. दक्षता पथक आणि प्रादेशिक विभागाने संयुक्तरीत्या ‘ऑपरेशन सोलर’ राबवत धडक कारवाई केली. त्यामुळे जिल्ह्यातील राखीव वनजमिनीवरील अतिक्रमण थाटणाऱ्या भूमाफियांसह त्यांना संरक्षण देणाऱ्या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

नांदगाव वनपरिक्षेत्राच्या तळवाडे नियतक्षेत्रातील डॉक्टरवाडी व पांझण येथे सुमारे ४०० एकर वनक्षेत्र १९६३ मध्ये महसूल विभागाला वाटप झाले होते. महसूल विभागाने वनविभागाची परवानगी न घेताच हे क्षेत्र सोसायट्यांना उपजीविकेसाठी वाटप केले होते. दिल्लीच्या टी. पी. सौर्या कंपनीनेही वनविभागाची परवानगी न घेता संबंधित सोसायटीकडून परस्पर क्षेत्र खरेदी करून ‘वन’संज्ञेतील जमिनीवर कोट्यवधी रकमेचा शंभर मेगावॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारल्याचे १८ जानेवारीला उघड झाले.

टी. पी. सौर्या कंपनीने वनसंवर्धन अधिनियम १९८० चा भंग केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वनगुन्हा दाखल करून खुलासा करण्याची नोटीस बजाविली हाेती. त्यानंतरही संबंधित कंपनीकडून काम सुरूच ठेवल्याने मुख्य वनसंरक्षक नितीन गुदगे यांच्या आदेशानुसार व उपवनसंरक्षक उमेश वावरे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऑपरेशन सोलर’ राबविण्यात आले. प्रकल्पाचे सर्व साहित्य व ट्रान्समिशन यंत्रणा जप्त करून त्याच्या पावतीद्वारे सर्व साहित्य संबंधित कंपनीच्या ताब्यात देण्यात आले. तसेच वीज विक्रीला पायबंद करण्यासाठी तहसीलदारांमार्फत महावितरणला पत्र देण्यात आले आहे.

असे होते ‘ऑपरेशन सोलर’

‘ऑपरेशन सोलर’साठी सहायक वनसंरक्षक सुजित नेवसे यांसह वणी दक्षता पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय पवार, सुरगाणा पथकाचे राहुल घरटे, रवींद्र भोगे, नांदगावचे अक्षय म्हेत्रे या अधिकाऱ्यांसह शंभर अधिकारी, कर्मचारी व पंधरा वाहनांसह पोलिस व वन कर्मचाऱ्यांचा सशस्त्र बंदोबस्त होता. सशस्त्र वनाधिकाऱ्यांसह पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात संपूर्ण प्रकल्प ‘सील’ करून साहित्य जप्त करण्यात आले. संपूर्ण कारवाईचे ड्रोन कॅमेऱ्याद्वारे शूटिंग करून पुढील आदेशापर्यंत काम बंद ठेवण्याचे निर्देश संबंधित कंपनीला देण्यात आले. कारवाईदरम्यान दोन्ही ठिकाणी मोठा तणाव निर्माण झाला होता.

हेही वाचा :

The post नाशिक : वनजमिनीवरील बेकायदेशीर सौरऊर्जा प्रकल्प सील appeared first on पुढारी.