नाशिक : वर्क फ्रॉम होम’च्या आमिषाने गृहिणीची 18 लाखांची फसवणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

‘वर्क फ्रॉम होम’च्या माध्यमातून संसारास आर्थिक हातभार लावण्याचा प्रयत्न एका गृहिणीस महागात पडला. भामट्याने पैसे देण्याच्या बहाण्याने गृहिणीकडून ३ ते २७ मार्च या कालावधीत तब्बल १८ लाख १८ हजार ३५४ रुपये घेऊन गृहिणीची फसवणूक केली आहे. या प्रकरणी गृहिणीने सायबर पोलिस ठाण्यात भामट्यांविरोधात फसवणुकीसह माहिती-तंत्रज्ञान कायद्यानुसार फिर्याद दाखल केली आहे.

खुटवडनगर येथील ३२ वर्षीय गृहिणीने सोशल मीडियाच्या माध्यमातून वर्क फ्रॉम होमचा शोध घेतला. त्यानुसार भामट्याने सुरुवातीस कंपन्यांना रिव्ह्युव्ह देण्याचा टास्क पूर्ण करण्याच्या मोबदल्यात पैसे देण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार गृहिणीस पैसे मिळत गेले. दरम्यान, भामट्याने गृहिणीस पैसे भरण्यास सांगून जादा परतावा देण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार गृहिणीने भामट्याने सांगितल्यानुसार लाखो रुपये त्याच्या बँक खात्यांवर वर्ग केले. तसेच भामट्यानेही त्यांना विविध टास्क पूर्ण करण्यास सांगितले, मात्र त्याचा मोबदला गृहिणीस दिला नाही. उत्पन्नाचे आकडे गृहिणीस फक्त ऑनलाइन दिसत होते. पैसे मिळत नसल्याने व भामट्याने ऑनलाइन व्यवहार बंद करीत संपर्क टाळल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गृहिणीने सायबर पोलिसांकडे धाव घेत तक्रार केली आहे.

टास्क अपूर्णच

दिलेला टास्क पूर्ण केल्यानंतर पैसे मिळणार, अशी अट भामट्याने घातली होती. त्यानुसार प्रश्नावली आल्यानंतर गृहिणी ती पूर्ण भरत होती. मात्र, अखेरचे एक-दोन प्रश्न भामट्याकडून दिले जात नसल्याने वेळेत टास्क पूर्ण होत नव्हता. त्यामुळे पुन्हा नवीन टास्क व त्या मोबदल्यात पैसे घेतले जात होते. टास्क पूर्ण न झाल्याने पैसे मिळणार नाही, असे भामट्याने गृहिणीस सांगत गंडा घातला.

यापूर्वीही अनेकांना लाखाेंचा गंडा

वर्क फ्राॅम हाेमचे आमिष दाखवून नागरिकांना गंडा घातल्याप्रकरणी शहरात गुन्हे दाखल आहेत. बँकेशी निगडित माहिती इंटरनेटवरून भरताना किंवा सर्फिंग करताना नागरिकांची माहिती भामटे संकलित करत असल्याचा संशय आहे. त्यानुसार ते नागरिकांना त्यांच्या जाळ्यात खेचून गंडा घालत आहेत. तसेच अनोळखी अॅप इन्स्टॉल करण्यास सांगून नागरिकांच्या मोबाइलचा ताबा मिळवूनही फसवणूक होत असल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : वर्क फ्रॉम होम'च्या आमिषाने गृहिणीची 18 लाखांची फसवणूक appeared first on पुढारी.