नाशिक : विनाहेल्मेट चालकांवर दंडात्मक कारवाई

विना हेल्मेट www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरात वाहतूक सुरक्षेसाठी हेल्मेटसक्तीबाबत अंमलबजावणी सुरू आहे. आठ दिवसांत शहर पोलिसांकडून 3,653 बेशिस्त चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. विनाहेल्मेट चालकांवर दंडात्मक कारवाई सुरू असतानाही चालकांकडून हेल्मेट वापराबाबत सकारात्मकता दिसत नसल्याने दररोज सरासरी 450 चालकांवर कारवाई होत आहे.

पोलिस आयुक्तालयातर्फे 1 डिसेंबरपासून शहरात हेल्मेटसक्ती मोहीम राबवली जात आहे. या कारवाईबाबत पोलिसांच्या ट्विटरवरून शहरातील कोणत्या भागात कारवाई होणार आहे याबाबत पूर्वकल्पना देण्यात येते. तरीदेखील चालकांकडून हेल्मेट वापराबाबत उदासीनता दिसत आहे. आठ दिवसांमध्ये नाशिक पोलिसांनी या कारवाईतून सुमारे 18 लाख रुपयांचा दंड आकारला आहे. दरम्यान, या आधीही हेल्मेटसक्ती मोहिमा राबवण्यात आल्या असून, त्यावेळी प्रबोधन, दंडात्मक कारवाई करून हेल्मेट वापराबाबत जनजागृती केली आहे. त्यातून काही प्रमाणात हेल्मेट वापराचे प्रमाण वाढल्याचा दावा पोलिसांकडून होत आहे. मात्र, अद्यापही अपघातांमध्ये हेल्मेट नसल्याने दुचाकीस्वारांचा मृत्यू होत असल्याने पोलिसांनी पुन्हा हेल्मेटसक्ती मोहीम सुरू केली आहे. पोलिस आयुक्तालयातर्फे कारवाईचे ठिकाण सोशल मीडियावरून सांगितले जाते. तरीही पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत शेकडो चालक विनाहेल्मेट आढळून येत आहेत. कारवाईच्या भीतीने काहीजण ठरावीक ठिकाणी हेल्मेट परिधान करतात, मात्र, स्वयंशिस्तीने हेल्मेट वापरणार्‍यांची संख्या अजूनही कमी आहे.

अधिकार्‍यांसह 300 अंमलदारांचा फौजफाटा
या कारवाईत एक पोलिस उपआयुक्त, एक सहायक आयुक्त, चार निरीक्षक व 300 अंमलदारांचा फौजफाटा तैनात आहे. हेल्मेट नसल्यास चालकास 500 रुपये दंड आकारण्यात येत आहे. त्यानुसार 1 ते 10 डिसेंबर दरम्यान, 4 व 9 डिसेंबरवगळता इतर दिवसांत चालकांवर 17 लाख 98 हजार रुपयांचा दंड आकारला आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : विनाहेल्मेट चालकांवर दंडात्मक कारवाई appeared first on पुढारी.