नाशिक : वृद्ध महिलेला मृत दाखवून जमीन लाटली ; न्यायालयाकडून ठकसेनला दणका

न्यायालय

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा

दुसऱ्याच मृत महिलेचा मृत्यू दाखला जोडून एकोणसत्तर वर्षीय जिवंत वृद्धेच्या शेतजमीन उताऱ्यावर स्वत:चे नाव लावणाऱ्या ठकसेनाने महिलेची व शासनाची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, वृद्धेने याबाबत वणी पोलिस व पोलिस अधीक्षकांकडे तक्रार करूनही दखल न घेतल्याने पीडितेने न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने वणी पोलिस ठाण्यात फसवणूक करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादी सरस्वतीबाई संपत महाले (वय ६९, रा. मुखेड गाव, ता. निफाड, जि. नाशिक) यांच्या नावे माळेदुमाला (ता. दिंडोरी) येथील गट नंबर २१८ क्षेत्र २ हेक्टर ४९आर अधिक पोटखराबा ४आर. एकूण क्षेत्र २ हेक्टर ५३ आर इतर अधिकारात होते. या सातबाऱ्यावर फिर्यादी वृद्धेचे नाव इतर अधिकारात असून व फिर्यादी जिवंत असतानाही विलास पांडुरंग पगार (वय ५७, रा. सिद्धी अपार्टमेंट, अयोध्या कॉलनी, दातेनगर, गंगापूर रोड, नाशिक) या संशयिताने दुसऱ्याच मृत महिलेच्या नामसाधर्म्याचा फायदा घेत जिवंत वृद्धा मृत झाल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र देऊन सरस्वतीबाई महाले यांचे नाव मिळकतीच्या उताऱ्यावरून कमी करीत स्वत:च्या नावावर करून घेतली. विशेष म्हणजे सदर नोंद मंजूर करताना महसूल अधिकारी यांनी कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पार न पाडता फिर्यादी जिवंत असूनही विलास पगार या नावाची बेकायदा नोंद केली.

असा आला प्रकार उघडकीस…

सरस्वती महाले यांनी आपल्या मिळकतीचा दि. २६ ऑगस्ट २२ रोजी सातबारा उतारा काढल्यानंतर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. यावेळी त्यांनी माळेदुमाला तलाठी यांच्याकडे चौकशी केली असता दि. ३१/०५/२२ रोजी विलास पगार याने अर्ज दिला की, माझी आजी सरस्वतीबाई संपत महाले ही दि. १७/०९/७९ रोजी मृत झाली आहे. तसेच अधीन त्याची आई श्रीमती इंदूबाई पांडुरंग पगार ही दिनांक २५/१०/२००७ रोजी मृत झाल्याचे व तसा मृत्यू दाखला सादर करीत दि. २३/०६/२०२२ रोजी मिळकतीवर सरस्वती महाले यांचे नाव कमी करून स्वत:चे नाव मंजूर करून घेतले.

पोलिसांचे तक्रारीकडे दुर्लक्ष…

सरस्वती महाले यांनी दि. ०५/०९/२२ रोजी याबाबत वणी पोलिस ठाणे येथे रीतसर तक्रार अर्ज दिला होता. परंतु पोलिसांनी कारवाई न केल्याने फिर्यादीने पोलिस अधीक्षक, नाशिक ग्रामीण यांच्याकडे दि. २२/०९/२२ रोजी अर्ज देऊन दाद मागितली. मात्र, तेथेही कोणतीही दखल न घेतल्याने पीडितेने न्यायालयात फिर्याद दाखल केली असता संशयिताने सरस्वतीबाई महाले यांचे नाव कमी करून त्यांची व शासनाची फसवणूक केल्याचे उघड होऊन बेकायदा स्वतःच्या नावावर क्षेत्र करून घेतल्याच्या आरोपावरून दिंडोरी न्यायालयाच्या आदेशान्वये वणी पोलिसांत गुन्हा दाखल झाल.

हेही वाचा : 

The post नाशिक : वृद्ध महिलेला मृत दाखवून जमीन लाटली ; न्यायालयाकडून ठकसेनला दणका appeared first on पुढारी.