नाशिक शहराच्या प्रवेशद्वारावरच तळीरामांचा उपद्रव

दारु,www.pudhari.news

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
नाशिक शहराचे प्रवेशद्वार अशी नाशिकरोडची ओळख आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ही ओळख पुसट होताना दिसत आहे . त्याला कारण म्हणजे उघड्यावर पार्ट्या अन् वाढदिवस साजरे करणार्‍या तळीरामांच्या बैठका होय. सायंकाळी पाच वाजेनंतर ते रात्री उशिरापर्यंत या भागात तळीरामांचा मुक्त संचार असतो. त्यामुळे विशेषत: महिला वर्ग अन् वयोवृद्ध नागरिक दहशतीखाली मार्गक्रमण करताना दिसतात. तळीरामांचा उपद्रव नाशिकरोड पोलिसांनी दूर सारण्याची मागणी होत आहे.

नाशिकरोड रेल्वेस्थानक परिसरात बेकायदेशीर मद्यविक्रीचे अड्डे आहेत. रात्री उशिरापर्यंत हे अड्डे अगदी सुरळीत सुरू असतात. या भागात पोलिसांचा कुठलाही धाक दिसत नाही. इतकेच नव्हे, तर येथे कोठेही उघड्यावर मद्य प्राशान केले जाते. नाशिकरोड रेल्वे पोलिस चौकीच्या आसपासदेखील असे प्रकार घडत आहेत.

पोलिस उपआयुक्तांनी लक्ष घालण्याची मागणी
नाशिकरोड पोलिस ठाण्यात सार्वजनिक ठिकाणांवर उघड्यावर तळीरामांचा उपद्रव सुरू असताना पोलिस यंत्रणा मात्र सुस्तावलेली दिसते. उघड्यावरील तळीरामांच्या सततच्या उपद्रवामुळे नाशिकरोडचे पोलिस निद्रितावस्थेत आहेत का, असा प्रश्न उपस्थित करीत कर्तव्यदक्ष अशी ओळख असलेल्या पोलिस उपआयुक्त विजय खरात यांनी याप्रश्नी लक्ष पुरवत उघड्यावरील तळीरामांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी त्रस्त नागरिकांकडून केली जात आहे.

हेही वाचा :

The post नाशिक शहराच्या प्रवेशद्वारावरच तळीरामांचा उपद्रव appeared first on पुढारी.