नाशिक शहरात ३ हजार ५५९ व्यक्तींना क्षयरोग, अशी आहेत लक्षणे

क्षयरोग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सन २०२२ या वर्षात नाशिक महापालिकेच्या क्षयरोग विभागाअंतर्गत खासगी व महापालिकेच्या दवाखान्यात एकूण ३ हजार ४५० रुग्णांचे निदान करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, ३ हजार ५९३ क्षयरुग्णांने निदान करण्यात येऊन १०४ टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे. सन २०२५ पर्यंत भारतातून क्षयरोगाला हद्दपार करण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने आखले आहे.

क्षयरोगाला हद्दपार करण्यासाठीचे अभियान यशस्वी करण्यासाठी लोकांचा सहभाग वाढला पाहिजे. समाजात क्षयरोगाविषयी असणारे भेदभाव कमी झाला पाहिजे. क्षयरुग्णांना योग्य आहार, उपचार वेळेवर मिळाल्यास क्षयरोग पूर्णपणे बरा होतो. समाजातील जास्तीत जास्त लोकांनी या अभियानात सहभागी होऊन क्षयरोगमुक्त नाशिक शहर व देश करण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन मनपा शहर क्षयरोग अधिकारी डॉ. कल्पना कुटे यांनी केले आहे.

दरम्यान, क्षयरोगाच्या निर्मूलनासाठी प्रत्येक रुग्ण दत्तक घेण्यासाठी ‘निक्षय मित्र’ योजना राबविण्यात येत आहे. त्यामध्ये दानशूर व्यक्ती, सेवाभावी संस्था, अधिकारी, राजकीय नेते यांनी रुग्ण दत्तक घेतलेले आहेत. ‘निक्षय मित्र’कडून रुग्णाला सहा महिने पोषण आहार पुरविला जातो. या पोषण आहारात तेल, बाजरी, ज्वारी, शेंगदाणे, कोणतीही एक डाळ यांचा समावेश होतो. समाजातील दानशुरांनी प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियानात ‘निक्षय मित्र’ म्हणून सहभागी होऊन क्षयरुग्णांना पोषण आहार द्यावा, असे आवाहन नाशिक मनपाने केले आहे.

६५३ रुग्णांना शिधा

शासनाकडून क्षयरुग्णांना दरमहा ५०० रुपये आर्थिक मदत मिळतेच. शिवाय समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था यांच्याकडूनदेखील सकस आहार देण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत. नाशिक शहरात जवळपास ६५३ क्षयरुग्णांना दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून शिधा पुरविला जात आहे.

क्षयरोगाची लक्षणे

दोन आठवडयांपेक्षा जास्त कालावधीचा खोकला, वजन कमी होणे, भूक मंदावणे, हलकासा ताप येणे, छातीत दुखणे ही क्षयरोगाची प्रमुख लक्षणे आहेत. रुग्ण राहत असलेल्या खोलीतील हवा खेळती ठेवावी. सकस आहार, फळे आहारात द्यावी. जेवण आणि औषधी वेळेवर घ्यावीत. मास्कचा वापर करावा.

रुग्णांची माहिती देणे बंधनकारक

खासगी दवाखान्यात निदान आणि उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. याकरिता सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिक, प्रयोगशाळा, रेडिओलॉजिस्ट यांनी स्वतःहुन पुढे येऊन निदान झालेल्या व उपचार घेत असलेल्या सर्व क्षयरुग्णांची माहिती शासनास कळवणे बंधनकारक आहे. जेणेकरून सर्व क्षयरुग्णांना योग्य उपचार व उपचार संपेपर्यंत पाठपुरावा क्षयरोग विभागामार्फत करणे शक्य होईल.

हेही वाचा :

The post नाशिक शहरात ३ हजार ५५९ व्यक्तींना क्षयरोग, अशी आहेत लक्षणे appeared first on पुढारी.