नाशिक : शाळेच्या पहिल्याच दिवशी भोसला स्कूलच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थी-पालकांचा ठिय्या

भोसला www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरातील शाळांमध्ये ढोलताशे, फुलांची उधळण आणि चॉकलेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले जात असताना भोसला मिलिटरी स्कूलच्या शिशुविहारमधील चिमुकले आणि त्यांच्या पालकांनी गुरुवारी (दि.१५) प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलन केले. नवीन इमारतीसाठी फंड घेऊनही जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतीत बालकांना बसविण्यात येत असल्याने पालकांनी शाळा प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला.

शाळा प्रवेशाचा उत्सव सर्वत्र साजरा होत असताना भोसला स्कूलच्या शिशुविहारमधील बालकांना शाळा प्रशासनाच्या आडमुठे धाेरणापायी या आनंदाेत्सवाला मुकावे लागले. नूतन शैक्षणिक वर्षात फी सोबत इमारत फंडही घेणाऱ्या शाळा प्रशासनाने बालकांना जुन्या व जीर्ण इमारतीमध्ये बसविले. पण ही इमारत धोकादायक व जीर्ण असल्याने पालकांनी त्यांच्या मुलांना या इमारतीत सोडण्यास असमर्थता दर्शविली. शाळेच्या प्रवेशद्वारावरच पाल्यांना बसवित शाळा प्रशासनाविरुद्ध आंदोलनाचा पवित्रा घेतला. यावेळी पालकांनी शाळेविरोधात घोषणाबाजी केल्याने गोंधळ निर्माण झाला.

दोनच दिवसांपूर्वी जुन्या व नवीन इमारतीच्या मुद्यावरून भोसला स्कूलच्या आवारात पालकांनी गोंधळ घातला होता. पाल्याच्या फीसोबत अवाच्या सव्वा इमारत फंड गोळा करूनही सरतेशेवटी मुलांना जुन्या इमारतीत प्रवेश देण्यावरून पालकांनी आक्रमक भूमिका घेतली. मात्र, त्यावेळी कोणताही ताेडगा निघाला नव्हता. गुरुवारी (दि.१५) पालक मुलांना घेऊन शाळेत आले असता जुन्याच इमारतीत वर्ग भरणार असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे संतप्त पालकांनी प्रवेशद्वारावरच आंदाेलन करत शाळा व्यवस्थापनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. भोसलात आंदोलन होत असताना शिक्षण विभागाकडून त्याची कोणतीही दखल न घेतल्यामुळे पालक अधिकच आक्रमक झाले.

प्रवेशद्वारावरच खाल्ला टिफिन

पालकांनी प्रवेशद्वारावर आंदोलन छेडत आपल्या मुलांना तेथेच बसविले. डोक्यावर ऊन तापत असताना समोर काय सुरू आहे याची साधी कल्पनाही चिमुकल्यांना नव्हती. अखेर प्रवेशद्वारावरच बालकांनी स्कूलबॅगमधील टिफिन काढून खावा लागला.

15 दिवसांत सुविधा देणार : देशपांडे
प्रशासकीय अधिकारी, व्यवस्थापन व पालकांच्या चर्चेनुसार, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे, यासाठी नवीन इमारतीत नव्या शैक्षणिक धोरणानुसार आवश्यक सुविधा येत्या १५ ते २० दिवसांत उपलब्ध करून देण्याचा व्यवस्थापनाचा प्रयत्न राहणार आहे. नवीन काम पूर्ण होईपर्यत इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग पूर्वी ज्या इमारतीमध्ये भरत होते, त्याच इमारतीत त्याचवेळेस सोमवार (ता.19)पासून भरविण्याचे ठरले आहे, अशी माहिती संस्थेचे सरकार्यवाह सीएमए हेमंत देशपांडे यांनी सांगितले.

अशी कृती अपेक्षित नव्हती
पालकांनी तीन दिवसांपूर्वी संस्था आवारात आंदोलन केले त्यावेळी व्यवस्थापन व निवडक आठ ते दहा पालकांमध्ये झालेल्या बैठकीत पुढील दहा-बारा दिवसांत आवश्यक कामे पूर्ण करत सुविधा उपलब्ध करून देण्याचे ठरले. तीन जुलैपासून इयत्ता 1 ते चौथीचे वर्ग भरविण्याबद्दलही बैठकीत ठरले असताना पालकांनी गुरुवारी (दि.१५) सकाळी विद्यार्थ्यांना गणवेशात शाळेच्या आवारात आणत पुन्हा आंदोलन छेडले. वास्तविक बैठकीत ठरलेले असताना सहकार्याऐवजी पालकांकडून अशा प्रकारची कृती अपेक्षित नव्हती, असे व्यवस्थापनाकडून स्पष्ट करण्यात आले.

हेही वाचा:

The post नाशिक : शाळेच्या पहिल्याच दिवशी भोसला स्कूलच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थी-पालकांचा ठिय्या appeared first on पुढारी.