नाशिक : शासनाने अद्यापही दखल न घेतल्याने दुस-या दिवशीही शेतक-यांचे उपोषण सुरुच

देवळा www.pudhari.news

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा

फुलेमाळवाडी ता.देवळा येथील गटनंबर ६६ मधील कुळांना डावलून परस्पर सदर जमीन खरेदी करणाऱ्यांची चौकशी करून न्याय मिळावा, यासाठी येथील जुन्या तहसील कार्यालयासमोर ३० पेक्षा जास्त शेतकरी गुरुवार (दि .२६) रोजी प्रजासत्ताक दिनापासून आमरण उपोषणास बसले आहेत. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाहीत असा इशारा त्यांनी दिला आहे. उपोषणाचा शुक्रवार, दि.27 दुसरा दिवस असूनही शासनाच्या वतीने कोणी दखल न घेतल्याने उपोषण कायम सुरु आहे.

याबाबत या उपोषणकर्ते शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री ,महसूलमंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, आमदार डॉ. राहुल आहेर यांच्यासह इतर संबंधित अधिकारी आणि पोलीस विभाग यांना निवेदने देत याबाबत कळवले आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, फुलेमाळवाडी ता. देवळा येथील गट नंबर ६६ वरील १७ हेक्टर १९ आर जमिनीचे मूळ सर्व्हेनंबर असलेल्या ३५५, ३५६, ३६८, ३६९ या गटांना या शेतकऱ्यांचे आजोबा कुळ असल्याने वारसाने त्या कब्जे वहिवाटीत गेल्या. ७०-७५ वर्षांपासून जमीन कसली जात असून तशा पिकपाहणींची सदरी नोंदी झाल्या आहेत. अर्थात मूळ जमीन मालक यांचा आता काही एक कब्जा नसताना सदर जमीन पौर्णिमा गायकवाड व इतरांच्या नावे ही जमीन खरेदी केली आहे. सदर मिळकतीबाबत कुळ जमीन मालक यांच्यात कुळ कायद्याच्या तरतुदीनुसार प्रकरण न्यायप्रविष्ट असताना देखील सदर जमिनीच्या खरेदी व्यवहारात बेकायदेशीर, नियमबाह्य काम करून तहसीलदार देवळा यांनी खरेदी व्यवहार नोंदणीकृत केला आहे. यामध्ये मंडळ अधिकारी लोहोणेर यांची मध्यस्थी असल्याचा आरोप  निवेदनाव्दारे करण्यात आला आहे.

तसेच सर्व प्रकरणातील व्यवहारामुळे कुळ कायदा तरतुदींचा भंग झाला असल्याचेही म्हटले आहे. या १७.१९ हेक्टर आर क्षेत्रजमिन वडिलोपार्जित कुळ म्हणून असल्याने त्यात या शेतकऱ्यांची घरे-विहिरी असून तशा नोंदी दप्तरी झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या जमिनी त्यांनी विकसित करून त्या लागवडीखाली आणल्या असून बागायती केल्या आहेत. असे असताना अधिकारी व इतरांनी संगनमताने प्रतिबंधित गट खुला करून खरेदी-विक्री व्यवहार नोंदणीकृत झाला आहे. त्यामुळे या कुळांच्या ५० ते ६० कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. या अन्यायाबाबत शासन तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे निवेदने देण्यात आली असून, याबाबत तत्काळ चौकशी होऊन न्याय मागणीसाठी आमरण उपोषण करत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. उपोषण करणाऱ्यांमध्ये बापू बच्छाव ,रामचंद्र बागूल, नानाजी शेवाळे, दादाजी बच्छाव, नथु आहिरे, दयाराम बागूल, बुधा बच्छाव, शिवाजी शेवाळे, लक्ष्मण शेवाळे, अनिल शेवाळे, पुंडलिक शेवाळे, सरलाबाई शेवाळे, मधुकर बच्छाव, भागाबाई बच्छाव, भीमाबाई शेवाळे, लताबाई शेवाळे, कुसुमबाई शेवाळे, उज्वला बागूल, सुभाष बागूल, संजय आहिरे, चंद्रकांत बच्छाव, पोपट बच्छाव, विनोद शेवाळे, तुषार बागूल, साहेबराव बागूल, नानाजी बच्छाव आदी शेतकऱ्यांचा समावेश आहे. तर यंदाच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनापासून उपोषणस्थळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील आहेर , माजी जि प सदस्या नूतन आहेर , प्रहारचे जिल्हाउपाध्यक्ष कृष्णा जाधव ,तालुका अध्यक्ष संजय दहिवडकर , स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव , नमो फौंडिशनचे किशोर आहेर आदींनी भेट देऊन शेतक-यांना पाठिंबा दर्शविला.  तसेच शुक्रवार, दि. 27 आज सकाळी निवासी नायब तहसीलदार गौरी धायगुडे ,सहायक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ या अधिकाऱ्यांनी भेट देऊन उपोषण कर्त्यांचे म्हणणे एकूण घेतले.

अन्यायग्रस्त सर्व शेतकरी हे अल्पभूधारक गरीब आहेत. काही धनदांडगे शेतकरी त्यांच्यावर अन्याय करू पाहताय, परंतु आम्हाला विश्वास आहे की या शेतकऱ्यांना न्याय मिळेल आणि त्यासाठी आम्ही त्यांच्या सोबत आहोत आणि वेळ आली तर महाराष्ट्रातील सर्व शेतकरी संघटना आम्ही एकत्र आणू. – यशवंत गोसावी, अध्यक्ष, किसान युवा क्रांती संघटना.

हेही वाचा:

The post नाशिक : शासनाने अद्यापही दखल न घेतल्याने दुस-या दिवशीही शेतक-यांचे उपोषण सुरुच appeared first on पुढारी.