नाशिक : शासन आपल्या दारी’ला काळे झेंडे दाखविण्याचा इशारा

शासन आपल्या दारी www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आउटसोर्सिंग साफसफाई ठेकेदारीमुळे महापालिकेच्या सफाई कामगारांवर मोठा अन्याय झाला असून, नाशिकच्या औद्योगिक न्यायालयाने कामगारांच्या बाजूने निकाल देऊनदेखील मनपा प्रशासनाकडून कार्यवाही होत नसल्याने शनिवारी होत असलेल्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाला काळे झेंडे दाखविणार असल्याचा इशारा वाल्मीकी मेघवाळ मेहतर समाज संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन मनपा आयुक्तांना देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले की, ‘औद्योगिक न्यायालयाने आउटसोर्सिंग साफसफाई ठेकेदारीबाबत कोणतीही कार्यवाही न करण्याचे आदेश मनपाला दिले होते. मात्र, आउटसोर्सिंग साफसफाई ठेक्याची मुदत संपणार असल्याने पुन्हा आउटसोर्सिंग ठेकेदारीची ई-निविदा काढून साफसफाई ठेकेदारी राबविण्याचा प्रयत्न मनपाकडून केला जात आहे. ठेकेदाराच्या कामकाजाबाबत आतापर्यंत अनेक तक्रारी आलेल्या आहेत, तसेच न्यायालयात दावे दाखल आहेत, मात्र अशातही मनपा प्रशासनाकडून ठेक्याचा घाट घातला जात असल्याने यामागील गौडबंगाल काय? असा प्रश्न निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे. दरम्यान, याबाबत संघटनेच्या माध्यमातून वारंवार पत्रव्यवहार, निवेदने देऊनदेखील मनपा प्रशासनाकडून कार्यवाही केली जात नसल्याने सफाई कामगारांवर मोठा अन्याय होत आहे. त्यामुळे महापालिकेने याबाबत तत्काळ निर्णय घ्यावा अन्यथा शासन आपल्या दारी कार्यक्रमाप्रसंगी काळे झेंडे दाखवून निषेध नोंदविला जाणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दादा भुसे, जिल्हाधिकारी तसेच पोलिस आयुक्तांना निवेदनाची प्रत पाठविण्यात आली आहे. समितीचे सुरेश दलोड, सुरेश मारू, रमेक मकवाना, राजेंद्र कल्याणी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : शासन आपल्या दारी'ला काळे झेंडे दाखविण्याचा इशारा appeared first on पुढारी.