नाशिक | शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी मनपा अधिकाऱ्यांना दहा हजार लाभार्थ्यांचे टार्गेट

नाशिक मनपा,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

येत्या शनिवारी (दि. १५) होऊ घातलेल्या ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासनासह महापालिका अधिकाऱ्यांनाही विविध जबाबदाऱ्या देण्यात आल्याने, सध्या अधिकारी कार्यालयात कमी अन् फिल्डवर अधिक दिसून येत आहेत. या कार्यक्रमासाठी जिल्हाभरातील लाभार्थ्यांना आणले जाणार असून, महापालिकेच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना तब्बल दहा हजार लाभार्थी जमविण्याचे टार्गेट देण्यात आले आहे. त्याव्यतिरिक्त व्हीआयपीसह नागरिकांसाठी चार पार्किंग स्थळेही उभारण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी जिल्हाभरातील सुमारे ३५ ते ४० हजार लाभार्थ्यांना आणले जाणार आहे. त्याकरिता परिवहन विभागाच्या ४५०, तर सिटीलिंकच्या १५० असे एकूण सहाशे बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनासह मनपा अधिकाऱ्यांना लाभार्थी आणण्यासाठीचे टार्गेट देण्यात आले आहे. विशेषत: अतिक्रमण विभागाकडे याबाबतची अधिक जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामध्ये बचत गट, हॉकर्स, फेरीवाले, पथविक्रेते आदींना कार्यक्रमस्थळी आणावे लागणार असल्याने त्यादृष्टीने सध्या बैठकांचा धडाका सुरू आहे. इतर विभागातही असेच चित्र आहे. त्याचबरोबर मनपाच्या बांधकाम विभागाला व्हीआयपीसह नागरिकांसाठी चार पार्किंगचे स्थळे उभारण्याची जबाबदारी दिली असून, त्यादृष्टीने सध्या काम सुरू आहे.

दरम्यान, ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह पालकमंत्री दादा भुसे, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, ना. छगन भुजबळ आदींची उपस्थिती असणार आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील काँग्रेस, एमआयएम पक्षाचे आमदार वगळता इतर सर्व सत्ताधारी पक्षाचे आमदार येण्याची शक्यता असल्याने त्यादृष्टीने नियोजन करण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांवर असणार आहे.

बैठकांचा धडाका

या कार्यक्रमासाठी लाभार्थी आणण्याचे मोठे आव्हान असणार आहे. त्यासाठी राजकीय पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना त्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या असून, सध्या राजकीय पदाधिकारी आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकांचा धडाका सुरू आहे.

The post नाशिक | शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी मनपा अधिकाऱ्यांना दहा हजार लाभार्थ्यांचे टार्गेट appeared first on पुढारी.