नाशिक : श्री कालभैरवनाथ यात्रोत्सवातून हिंदू-मुस्लीम एकतेचे दर्शन

श्री कालभेैरव यात्रा,www.pudhari.news

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा

वडनेर भैरव गावचे ग्रामदैवत श्री कालभैरवनाथ महाराज व माता जोगेश्वरी यात्रोत्सवाचे अनोखे वैशिष्टय म्हणजे गावातील सर्व हिंदू–मुस्लीम समाज एकत्र येऊन हा यात्रोत्सव साजरा करत राष्ट्रीय एकात्मतेचे एक अनोखे उदाहरण संपूर्ण जगासमोर ठेवत आहेत. यात्रोत्सवात राज्यातून जवळपास दोन लाख भाविकभक्त आतापर्यंत श्री कालभैरवनाथ महाराजांच्या चरणी लीन झाल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष तथा उत्सव अध्यक्ष योगेश साळुंखे यांनी दिली.

कालभैरवनाथ कावड यात्रेने व गंगाजल अभिषेकने कालभैरवनाथ यात्रेच्या घटस्थापनेची सुरुवात वडनेरकरांच्या वतीने करण्यात आली. हिंदूधर्मीय विवाह पद्धतीप्रमाणे दरवर्षी कालभैरवनाथ महाराजांचे दरवर्षी विवाहाचे विधी पारंपरिक पद्धतीने होतात. छबिना सोहळ्यात भालेराव पाटील आणि मुसलमान पटेल यांनी विधिवत पूजा करून देवांचा साखरपुडा केला. पहाटे मानकरी महिलांनी कालभैरवनाथ जोगेश्वरी माता यांचे तेलवण पाडल्यानंतर वक्ते परिवाराच्या वतीने कालभैरवनाथ व जोगेश्वरी माता यांना रथात स्थानापन्न करण्यात आले. त्यापूर्वी शासकीय पूजा म्हणून अहिल्यादेवी होळकरांच्या वतीने श्री व सौ. नानासाहेब पाटील यांच्या हस्ते कालभैरवनाथ जोगेश्वरी माता यांची विधिवत पूजा करण्यात आली. त्यांना मानाची पूजा म्हणून पगडी त्याचबरोबर नैवेद्य व नवीन वस्त्र देवास अर्पण करण्यात आले. मुसलमान पटेल यांची पहिली मानाची बैलजोडी जुंपून रथयात्रा मार्गस्थ झाली.

ट्रस्ट व यात्रा समितीचे अध्यक्ष योगेश साळुंखे, उपाध्यक्ष बाळासाहेब तिडके, बाळासाहेब वाघ, सरचिटणीस यांच्यासह ट्रस्टी यांनी आलेल्या भाविकांचे स्वागत केले. यात्रा समितीच्या वतीने बैलगाडा शर्यत व कुस्त्यांचे आयोजन भव्य प्रमाणात करण्यात आले.

गावापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या जाणूस घरी कालभैरवनाथ महाराज व जोगेश्वरी माता यांना सवाद्य मिरवणुकीने रथातून नेण्यात आले. हजारो भक्तांनी जाणूस घरी देवांचे दर्शन घेतल्यानंतर परतीच्या प्रवासाच्या मार्गासाठी रथ सज्ज करण्यात आला. वडनेर भैरव पोलिस स्टेशनचे अधिकारी मयूर भामरे यांनी चोख बंदोबस्त ठेवला तर ग्रामपंचायत वडनेर भैरवच्या वतीने सरपंच सुनील पाचोरकर यांनी गावातील पाणीपुरवठा वीजपुरवठा व स्वच्छता यावर विशेष लक्ष केंद्रित केले. आज गुरुवारी (दि.६) छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून मानकरांचे बैल जुंपून परतीची रथयात्रा सुरू होईल.

हेही वाचा :

The post नाशिक : श्री कालभैरवनाथ यात्रोत्सवातून हिंदू-मुस्लीम एकतेचे दर्शन appeared first on पुढारी.