नाशिक : श्री श्री राधा मदन गोपाल यांना एक टन फुलांचा अभिषेक

इस्काॅन मंदिर www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

वृंदावन आणि सोलापूरहून आणलेला देशी गुलाब, बंगळुरूहून आणलेले सायली व मोगरा तसेच गुलाब, चाफा, झेंडू, सोनचाफा, चमेली, बिजली इत्यादी तब्बल एक टन फुलांच्या पाकळ्यांचा अभिषेक येथील श्री श्री राधा मदनगोपाल यांच्या विग्रहांना करण्यात आला. निमित्त होते द्वारका येथील इस्कॉन मंदिरातील राधा मदन गोपाल यांच्या प्राणप्रतिष्ठा तपपूर्तीचे.

यावेळी पुष्पांनी सजविलेली वेदी, नेत्रांना भुरळ घालणारे विग्रहांचे सुंदर मनोहर रूप आणि भाविक श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे लोकनाथ स्वामी महाराजांचे कीर्तन व प्रवचन हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. इस्कॉन मंदिरातील राधा मदन गोपाल यांच्या प्राणप्रतिष्ठेला १२ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त राधा-कृष्ण यांच्या विग्रहांना पुष्पाभिषेक करण्यात आला. हरे कृष्ण मंदिरात साजरा होणारा हा प्रसिद्ध महोत्सव असून, आबालवृद्धांना आकर्षित करणाऱ्या या सोहळ्याला शेकडो भाविकांनी हजेरी लावली. महोत्सवाला सकाळी ५ च्या मंगल आरतीपासून सुरुवात झाली. त्यानंतर हरे कृष्ण महामंत्र जप, दर्शन आरती, श्रीमत भागवत प्रवचन झाले. सायंकाळी ६ पासून मंदिरात कीर्तन सुरू होते. लोकनाथ स्वामी महाराजांचे प्रवचन झाले. लोकनाथ स्वामी महाराज हे श्रील प्रभुपादांचे वरिष्ठ संन्यासी शिष्य आहेत व ते इस्कॉनमध्ये गुरू तसेच जीबीसीदेखील आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा द्विगुणित झाली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीमान गोपालानंद प्रभू, माधवकृष्ण प्रभू, मुकुंदरस प्रभू, लीलाप्रेम प्रभू, राजा रणछोड प्रभू, सहस्र्र शीर्ष प्रभू, जानकीनाथ प्रभू, सार्वभौम कृष्ण प्रभू, भगवान नृसिंह प्रभू, दाऊजी बलराम प्रभू, अक्षय एडके, सुमेध पवार, प्रिया गोरे माताजी, भोये माताजी, देसाई माताजी तसेच अनेक भक्तांनी योगदान दिले.

भगवद् गीता (९.२६) सांगते की, आपण जे काही फळ, फूल, पाणी आदी भक्तिभावाने अर्पण करतो, ते भगवान श्रीकृष्ण प्रेमाने स्वीकार करतात. म्हणून इस्कॉनमध्ये पुष्पाभिषेकाद्वारे भक्त आपले प्रेम प्रकट करतात. भगवान श्रीकृष्ण हे प्रेमाचे भुकेले आहेत व भक्तांद्वारे प्रेमाने अर्पण केलेले सर्व काही ते स्वीकार करतात, असे विचार श्रील प्रभुपादांचे वरिष्ठ संन्यासी शिष्य लोकनाथ स्वामी महाराज यांनी मांडले. – लोकनाथ स्वामी महाराज.

हेही वाचा:

The post नाशिक : श्री श्री राधा मदन गोपाल यांना एक टन फुलांचा अभिषेक appeared first on पुढारी.