नाशिक : चौदा बाजार समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील चौदा कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. यामध्ये नाशिक, पिंपळगाव बसवंत, लासलगाव या मोठ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील या सर्व मोठ्या बाजार समित्या समजल्या जातात. या निवडणूक कार्यक्रमामुळे राजकीयद़ृष्ट्या वर्चस्व असलेल्या लोकप्रतिनिधींमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले.

नाशिक, पिंपळगाव बसवंत, लासलगाव यांच्यासह सिन्नर, येवला, नांदगाव, मनमाड, चांदवड, देवळा, घोटी, दिंडोरी, कळवण, सुरगाणा व मालेगाव या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालकपदाच्या जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. यासाठी प्रारूप मतदार याद्या सोमवारी (दि. 14) प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या मतदार यादीचा कार्यक्रम जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) डॉ. सतीश खरे यांनी जाहीर केला आहे. प्रारूप मतदार याद्यांबाबत 23 नोव्हेंबरपर्यंत हरकती नोंदविता येणार आहेत. 24 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीमध्ये दाखल झालेल्या हरकतींवर निर्णय दिला जाणार आहे. 7 डिसेंबरला या बाजार समित्यांच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

ग्रामीण राजकारण ढवळून निघणार
बाजार समिती हा तालुक्याच्या राजकारणात प्रवेश करण्याची संधी समजली जाते. त्यामुळे अनेक लोकप्रतिनिधी या निवडणुकीची तयारी करत आहेत. या निवडणूक कार्यक्रमाने ग्रामीण भागातील राजकारण ढवळून निघणार आहे, हे नक्की.

हेही वाचा :

The post नाशिक : चौदा बाजार समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला appeared first on पुढारी.