नाशिक : सप्टेंबरमधील अतिवृष्टीची भरपाई मार्चएन्डला

चांदवड www.pudhari.news

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यात सप्टेंबर 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपाचे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना राज्य शासनाकडून लवकरच आर्थिक मदत दिली जाणार आहे. त्यासाठी महसूल विभागामार्फत नुकसानग्रस्त शेतकर्‍यांचे बँक खाते, आधारकार्ड जमा करून याद्या पोर्टलवर अपलोड केल्या जात असल्याची माहिती तहसीलदार प्रदीप पाटील यांनी दिली.

तालुक्यात सप्टेंबर 2022 मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीसदृश पाऊस झाला होता. त्यामुळे खरिपातील कांदा, सोयाबीन, मका, टोमॅटो, बाजरी, भुईमुगासह भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान झाले होते. शेतकर्‍यांवर दुबार पेरणीची वेळ आली होती. तालुक्यात 36 हजार 104.71 हेक्टरवरील तब्बल 37 हजार 183 शेतकर्‍यांचे नुकसान झाल्याचा अहवाल महसूल विभागाने शासनाकडे पाठविला होता. या अतिवृष्टीत तालुक्यात सुमारे 62.51 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. नुकसानीचे पंचनामे होऊन अनेक महिने उलटले, तरी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना राज्य शासनाने एक रुपयादेखील मदत दिली नव्हती. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये रोष वाढला होता. आता निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने शेतकर्‍यांची मते पदरात पाडण्यासाठी राज्य सरकारला शेतकर्‍यांची आठवण आली. यासाठी राज्य शासनाने सप्टेंबर 2022 रोजी झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीची आकडेवारी थेट मागवली. तसेच शेतकर्‍यांच्या बँक खाते व आधारकार्डची मागणी केली. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना पंतप्रधान शेतकरी विमा योजनेसारखेच नुकसानीचे पैसे संबंधित शेतकर्‍याच्या खात्यावर वर्ग केले जाणार आहे. नुकसानीच्या याद्या तयार करण्यासाठी महसूल विभाग रात्रंदिवस राबत असल्याचे चित्र सध्या तहसील कार्यालयात दिसत आहे.

गावनिहाय याद्या पोर्टलवर दररोज अपलोड करण्याचे कामकाज सुरू आहे. मदतीची रक्कम ही राज्य शासनाकडून लाभार्थी शेतकर्‍यांच्या खात्यात वर्ग होणार आहे. – प्रदीप पाटील, तहसीलदार, चांदवड.

सप्टेंबर 2022 मधील नुकसानीचे आकडे
नुकसानीचे एकूण हेक्टरी क्षेत्रफळ – 36,104.71
नुकसानग्रस्त शेतकर्‍यांची संख्या – 37,183
नुकसानीची एकूण रक्कम – 62.51 कोटी

अशी मिळणार नुकसानभरपाई
तीन हेक्टरपर्यंत जिरायत क्षेत्रासाठी हेक्टरी 13,600, बागायती क्षेत्रासाठी हेक्टरी 27 हजार, तर फळपीक क्षेत्रासाठी हेक्टरी 36 हजार रुपये मिळणार आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : सप्टेंबरमधील अतिवृष्टीची भरपाई मार्चएन्डला appeared first on पुढारी.