नाशिक : सातपूर खूनप्रकरणात पिता-पुत्रांना जन्मठेप

न्यायालय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सातपूर येथे युवकाचा खून करणाऱ्या पिता-पुत्रांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दि. १४ नोव्हेंबर २०२० रोजी सातपूर येथील विश्वासनगरमधील हनुमान मंदिराजवळ ही घटना घडली होती. त्यात आरोपींनी संबलदेव रामसिंगार यादव (३०, रा. विश्वासनगर) याचा खून केला होता.

सुकट मोहोदर चौहान (५८), संदीप सुकट चौहाण (२२), संजय सुकट चौहाण (२५, सर्व रा. विश्वासनगर) अशी आरोपींची नावे आहेत. संगीता संबलदेव यादव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १४ नोव्हेंबरला त्यांच्या संबलदेव याचा साला अमरजित यादव व विशाल यादव यांच्यात वाद सुरू होता. त्यामुळे संदीप चाैहाण तेथे गेला व त्याने आरडाओरड का करतात, असा जाब विचारला. त्यावेळी अमरजित यादवने, हा आमचा वैयक्तिक विषय असून तू मध्ये का बोलतो, असे उत्तर दिले होते. त्याचा राग आल्याने चौहाण कुटुंबीयांनी बॅटने संबलदेवला मारहाण करीत गंभीर जखमी केले. उपचारादरम्यान, १८ नोव्हेंबरला संबलदेवचा मृत्यू झाला. या प्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात तिघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला होता.

उपनिरीक्षक टी. एम. राठोड यांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकारी पक्षातर्फे ॲड. सचिन गोरवाडकर यांनी युक्तिवाद केला. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व परस्थितिजन्य पुराव्यांच्या आधारे जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एस. कुलकर्णी यांनी आरोपींना जन्मठेप व प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलिस उपनिरीक्षक डी. एस. काकड, पोलिस नाईक वाय. डी. परदेशी यांनी कामकाज पाहिले.

हेही वाचा : 

The post नाशिक : सातपूर खूनप्रकरणात पिता-पुत्रांना जन्मठेप appeared first on पुढारी.