नाशिक : सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचा सन्मान

राज्यपाल www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचा नवभारत-नवराष्ट्र सीएसआर समीट अँड अवॉर्डस २०२३-पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचा नवभारत-नवराष्ट्र सीएसआर समीट अँड अवॉर्डस २०२३ या पुरस्काराने सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राजभवन मुंबई येथे बुधवारी (दि. 19) सायंकाळी आयोजित समारंभाचे प्रमुख पाहुणे राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते क्रॉपोरेट सोशल रिस्पॉन्सिबीलिटी (सीएसआर) म्हणजेच समाजसेवा व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कंपन्या व संस्था यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. या पुरस्कार सोहळ्यात सामजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारी शैक्षणिक संस्था म्हणून नाशिक जिल्ह्यातील साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण जोशी, सचिव मिलिंद पांडे, खजिनदार अनिल अरिंगळे, विश्वस्त डॉ. भूषण कानवडे यांना नवभारत सीएसआर पुरस्काराने राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी राज्यपाल रमेश बैस म्हणाले की, मेट्रो शहरातील महिला मूलभूत सुविधापासून वंचित असल्याने वसतिगृहे, रेल्वेस्थानक स्वच्छतागृहे आणि मुबंई सारख्या गजबजलेल्या भागात काम करणाऱ्या महिलांना मूलभूत सुविधा देण्यासाठी कॉर्पोरेट क्षेत्राने पुढे यावे. भारतीय उद्योजक हे देशात समाजसेवेसाठी नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. सीएसआरमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सर्व पुरस्कार विजेत्या व्यक्ती आणि संस्था यांचे मी अभिनंदन करतो. तुम्ही सर्व पुरस्कारार्थी इतरांसाठी प्रेरणा व्हा. असे आवाहन त्यांनी उपस्थित मान्यवर यांना केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपले सरकार कॉर्पोरेट क्षेत्राला सीएसआरच्या कार्यात मदत करण्यासाठी सदैव तत्पर आहे. समाजातील मागासलेल्या घटकांच्या कल्याणासाठी त्यांच्या सीएसआर योजनांमध्ये सरकारची मदत घेणारे उद्योजक आणि सामाजिक व शैक्षणिक संस्था यांना सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल. असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सीएसआरच्या माध्यमातून वंचित घटकांतील समाजाला मुख्य प्रवाहात जोडण्याचे काम केले जात आहे. असेही मत नवभारत-नवराष्ट्र सीएसआर अवॉर्डस २०२३ सोहळ्याच्या प्रसंगी विशेष पाहुणे म्हणून उपस्थित असलेले विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केले. सोहळ्याला नवभारत-नवराष्ट्रचे व्यवस्थापकीय संपादक निमिष माहेश्वरी, नवभारत समूहाचे संचालक वैभव माहेश्वरी, हिंदुजा रिन्यूबल्सचे अध्यक्ष शोम हिंदुजा, कॉर्पोरेशनचे अध्यक्ष युवराज ढमाले तसेच अनेक उद्योजक व शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल संस्था परिवारातील विविध शाखांचे पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी संस्था पदाधिकारी यांचे अभिनंदन केले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचा सन्मान appeared first on पुढारी.