धरणांच्या जिल्ह्यात पाणीबाणी

गंगापूर धरण www.pudhari.news

नाशिक : सतिश डोंगरे

प्रासंगिक :

2016 आणि 2019 मध्ये पाणीकपातीचा सामना करावा लागलेल्या नाशिककरांना पुन्हा एकदा या संकटाला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत. दक्षिण प्रशांत महासागरात अल निनो वादळ निर्माण होऊन त्याचा परिणाम मान्सून लांबणीवर होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविल्याने, किमान ऑगस्टपर्यंत नाशिककरांना पाणी पुरविण्याचे नियोजन प्रशासनाकडून केले जात आहे. नाशिक जिल्हा औरंगाबाद तसेच नगर जिल्ह्यांची तहान भागवितो. यंदाची स्थिती विपरीत आहे. धरणांमधील पाणीसाठ्याचे आकडे बघता नाशिककरांवर पाणीकपातीचे संकट बळजबरीने थोपविण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप करीत औरंगाबादची तहान भागविण्यासाठीच नाशिककरांवर पाणीकपात लादली जात असल्याचा सूर शिवसेना ठाकरे गटाने आळवल्याने पाण्यावरून जिल्ह्यातील राजकीय आखाडा तापण्याची शक्यता आहे.

नाशिक जिल्ह्याचाच विचार केल्यास मनमाडमध्ये 15 ते 17 दिवसांआड पिण्याचे पाणी सोडले जाते. नांदगावमध्येही काहीशी अशीच स्थिती आहे. सिन्नरची दुष्काळग्रस्त तालुका म्हणून ओळख निर्माण होत आहे. त्या तुलनेत नाशिक शहराची स्थिती सध्या चांगली असली, तरी भविष्याचा वेध घेणे अवघड आहे. हवमान खात्याने वर्तविलेला अल निनो वादळाचा अंदाज खरा ठरला, तर नाशिककरांना पाणीबाणीचा सामना करावाच लागेल. नाशिकला गंगापूर, दारणा व मुकणे धरणांतून पाणीपुरवठा केला जात असून, सद्यस्थितीत गंगापूर धरणाच्या समूहसाठ्यात 5 टीएमसी, तर दारणा धरणाचा समूहसाठा 9 टीएमसी असा एकूण 14 टीएमसी पाणीसाठा आहे. नाशिक शहरासाठी ऑगस्टअखेरपर्यंत 2.6 टीएमसी पाणी पिण्यासाठी लागणार आहे. सिंचनासाठी चार आवर्तने गृहीत धरली, तरी 1.2 टीएमसी पाणी लागेल. पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याचा एकत्रित विचार केला, तरी एकूण 3.8 टीएमसी पाणी 31 ऑगस्ट अखेरपर्यंत लागणार आहे. त्यामुळे अतिरिक्त 10 टीएमसी पाणीसाठा कुणासाठी राखीव ठेवला आहे असा सवाल ठाकरे गटाकडून उपस्थित केला जात आहे. त्याचबरोबर महापालिकेने पाणीबचत केली, तर धरणात पाणी साठून राहील. औरंगाबादच्या जायकवाडी धरणाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी ते पाणी आवर्तनाच्या रूपाने पुढे सोडले जाईल अशी शंकाही ठाकरे गटाने उपस्थित केली.

दुसरीकडे धरणातील उपलब्ध पाणीसाठा व पुढील चार महिने नाशिककरांची तहान भागविण्याचे गणित जुळविताना तब्बल 600 दलघफू पाण्याची कमतरता भासणार आहे. अशात 24 दिवस ड्राय डे फॉर्म्युला राबविण्याचे नियोजन प्रशासनाकडून केले जात आहे. गंगापूर, दारणा व मुकणे या तिन्ही धरणांतून दरवर्षी महापालिकेचे 800 दलघफू पाणी आरक्षण असते. हे पाणी 31 जुलैपर्यंत पुरविले जाते. अशात पाऊस लांबल्यास 31 ऑगस्टपर्यंत म्हणजेच एक महिना अतिरिक्त नियोजन करताना महापालिकेला 600 दलघफू पाणी लागणार आहे. त्यामुळे महापालिकेने जलसंपदा विभागाला अतिरिक्त 200 दलघफू पाण्याची मागणी केली असली, तरी 400 दलघफू पाणी तुटवडा भासणार आहे. अशात पाणीकपात अटळ असून, प्रशासनाकडून कुठल्याही क्षणी त्याबाबतची घोषणा केली जाणार आहे. मात्र, यावरून राजकीय रणकंदन पेटण्याची शक्यता असल्याने, सत्ताधारी विरुद्ध विरोधक आमने-सामने उभे राहण्याची शक्यता आहे. सत्ताधारी गटाच्या मते, प्रशासनाकडून केले जात असलेल्या पाण्याच्या नियोजनावरून राजकारण करणे गैर आहे. हा काही राजकारणाचा मुद्दा होऊ शकत नाही. सद्यस्थितीत धरणात जो जलसाठा दिसून येतो, तो साठा बाष्पीभवनातून मोठ्या प्रमाणात घटू शकतो. त्यामुळे या आकड्यांवरून राजकारण करून तुम्ही नेमके काय साध्य करणार? असा सवाल उपस्थित केला. तर विरोधकांनी इतर जिल्ह्यांची तहान भागविण्यासाठी नाशिककरांचा घसा कोरडा ठेवण्याचा तुम्ही खटाटोप करीत असल्याचा घणाघात केला. एकंदरीत, पाणीकपातीचा निर्णय हवामानाच्या अंदाजाचा वेध घेऊन घेतला जात असला, तरी त्यावरून राजकीय वातावरण गढूळ होण्याची शक्यता आहे.

2018 ची पुनरावृत्ती होणार?
2018 मध्ये पाऊस कमी झाला, तेव्हा नाशिक जिल्ह्यासह राज्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्यावेळी गंगापूर धरण समूहात अवघा 2.5 टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. त्यावेळीदेखील नेहमीच नाशिकवर अवलंबून असलेल्या मराठवाड्याने नाशिककडे पाण्यासाठी तगदा लावला होता. अर्थात मराठवाड्याची पाण्याची ही अतिरिक्त मागणी असल्याने, हा वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला होता. तेव्हा न्यायालयाने मराठवाड्याच्या बाजूने कौल दिल्यामुळे 31 डिसेंबर 2018 रोजी गंगापूर धरण समूहातून पोलिस बंदोबस्तात 1 टीएमसी पाणी मराठवाड्यासाठी सोडण्यात आले होते. परिणामी नाशिककरांना 2019 च्या पावसाळ्यापर्यंत उर्वरित पाण्यावर भागवावे लागले होते. यंदाही अशीच स्थिती असल्याने, नाशिक – मराठवाडा पाणी वाद तर पेटणार नाही ना ? अशी शंका यानिमित्त उपस्थित केली जात आहे.

The post धरणांच्या जिल्ह्यात पाणीबाणी appeared first on पुढारी.