नाशिकमध्ये उद्या येणार १८ हजार ईव्हीएम, बंगळुरू येथून रवाना

ईव्हीएम मशीन,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

वर्षभरावर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी मोट बांधायला सुरुवात केली असतानाच जिल्हा प्रशासनही निवडणुकांच्या तयारीला लागले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने जिल्ह्यासाठी १८ हजार ईव्हीएम उपलब्ध करून दिले आहेत. मंगळवार (दि. २५) पर्यंत बंगळुरू येथून हे मशीन नाशिकमध्ये पोहोचणार आहेत.

पुढील वर्षी देशात फेब्रुवारी-मार्चमध्ये लोकसभा निवडणूकांचे पडघम वाजणार आहेत. या निवडणुकीत विजय संपादन करण्यासाठी छोट्या-मोठ्या राजकीय पक्षांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. त्यातूनच आघाड्या व युतींच्या बोलणींना वेग आला आहे. सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. त्यामुळे देशभरात निवडणुकीसाठी वातावरणनिर्मिती व्हायला सुरुवात झाली आहे. एकीकडे राजकीय पक्ष कामाला लागले असताना, स्थानिक पातळीवरही जिल्हा प्रशासनाने निवडणूकीसाठी आवश्यक तयारी सुरू केली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघांसाठी पहिल्या टप्प्यात १८००० ईव्हीएम उपलब्ध करून दिली आहेत. त्यामध्ये ११ हजार कंट्रोल, तर ७ हजार बॅलेट युनिटचा समावेश आहे. हे मशीन ताब्यात घेण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेची एक टीम बंगळुरूमधील भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (भेल) कंपनीत दाखल झाली आहे. ही टीम मंगळवार (दि. २५) पर्यंत मशीन घेऊन नाशिकमध्ये पोहचणार आहे. सय्यद प्रिंप्री (ता. नाशिक) येथील निवडणूक शाखेच्या गोदामात ही मशीन सुरक्षित ठेवली जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

व्हीव्हीपॅटचे स्कॅनिंग पूर्ण

जिल्ह्यासाठी निवडणूक आयोगाने नवीन ७ हजार १०० व्हीव्हीपॅट मशीन उपलब्ध करून दिली आहेत. सय्यद पिंप्री येथील गोदामात या मशीनचे पहिल्या टप्प्यातील स्कॅनिंगची प्रक्रिया पूर्ण केली आहे. पुढच्या टप्प्यात भेल कंपनीचे अभियंते नाशिकमध्ये येऊन मशिनची तपासणी करणार असल्याचे समजते आहे.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये उद्या येणार १८ हजार ईव्हीएम, बंगळुरू येथून रवाना appeared first on पुढारी.