नाशिक : जिल्ह्यात ८४ टक्के लाभार्थींना आनंदाचा शिधा

आनंदाचा शिधा, नाशिक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वितरीत करण्यात आलेला आनंदाचा शिधा जिल्ह्यातील ८४ टक्के रेशनाकर्ड लाभार्थींपर्यत पोहोचला आहे. अद्यापही १६ टक्के लाभार्थी शिधा किटपासून वंचित आहेत. सण-उत्सवासाठीचा हा शिधा वेळेत न मिळाल्याने या नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.

राज्यातील जनतेचा सण-उत्सवाचा गोडवा वाढविण्यासाठी शासनाने 100 रुपयांमध्ये आनंदाचा शिधा किट उपलब्ध करून दिला. गत दिवाळीच्या धर्तीवर शिधा किटमध्ये प्रत्येकी एक किलो चणाडाळ, साखर व रवा तसेच एक लिटर तेलाचा समावेश आहे. गेल्या महिन्यातील गुढीपाडव्यापासून ते १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपर्यंत रेशनकार्ड लाभार्थींना या किटचे वितरण करण्याचे आदेश शासनाने दिले होते.

नाशिक जिल्ह्यातील अंत्योदय व प्राधान्य रेशन कार्डधारकांसाठी पुरवठा विभागाने सात लाख ८२ हजार ५६२ किटची मागणी शासनाकडे नोंदविली होती. त्यानुसार शासनाने किटही उपलब्ध करून दिले होते. मात्र, कीटमधील चारही वस्तू आणि किटच्या पिशव्या वेळेत उपलब्ध करून दिल्या नाहीत. त्यामुळे किट वितरणात अडचणी आल्या. पुरवठा विभागाने रेशन दुकानांद्वारे आतापर्यंत सहा लाख ५७ हजार ३२१ लाभार्थींपर्यंत किट पोहोचते केले. अद्यापही एक लाख २५ हजार २४२ लाभार्थींना हे किट मिळालेले नाही. महिनाअखेरपर्यंत हे काम पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. मात्र, या सर्व घडामोडींत शासनाच्या दिरंगाईमुळे वेळेत किट हाती न पडल्याने लाभार्थींच्या आनंदावर विरजण पडले आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : जिल्ह्यात ८४ टक्के लाभार्थींना आनंदाचा शिधा appeared first on पुढारी.