नाशिक : सापडलेला मोबाईल परत देण्यासाठी गेला अन् जीव गमावून बसला

nashik crime,www.pudhari.news

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

सापडलेला मोबाइल परत देण्यासाठी गेलेल्या तीसवर्षीय युवकास बेदम मारहाण करण्यात आली. जखमी युवकावर उपचार सुरू असताना रविवारी मृत्यू झाला. या प्रकरणी अंबड पोलिसांनी तीन जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करून दोन जणांना अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत नितीन गणपत जाधव (वय ३०) यास दिनांक ७ एप्रिल शुक्रवारी एक मोबाइल सापडला होता. नितीन सापडलेला मोबाइल देण्यासाठी दि. ८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता सिडकोतील गॅलक्सी हॉस्पिटलसमोर त्रिमूर्ती चौक येथे गेला होता. या वेळी मोबाइल परत घेण्यासाठी आलेल्या संशयित नीलेश ठोके (३३ कामटवाडे), त्याचा साथीदार प्रसाद मुळे व अन्य एका साथीदाराने त्यास जबर मारहाण केली होती.

तर मारहाणीदरम्यान तू माझ्या पत्नीस फोन का करतो या कारणाहून लोखंडी रॉडच्या साह्याने त्याला मारहाण करून गंभीर जखमी केले. या नंतर जखमी नितीन यास उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले असताना सोळा दिवसांच्या उपचारानंतर रविवारी त्याचे निधन झाले.

या प्रकरणी मृत नितीन जाधव यांचे वडील गणपत जाधव यांच्या फिर्यादीनुसार अंबड पोलिस ठाण्यात संशयित नीलेश दिनकर ठोके (३३ कामटवाडे), त्याचा साथीदार प्रसाद शिरीष मुळे व अन्य एका साथीदारावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूरज बिजली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनील बिडकर अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा : 

The post नाशिक : सापडलेला मोबाईल परत देण्यासाठी गेला अन् जीव गमावून बसला appeared first on पुढारी.