नाशिक : सिडको महापालिका विभागीय अधिकाऱ्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा

नाशिक मनपा www.pudhari.news

नाशिक, सिडको : पुढारी वृत्तसेवा- अतिक्रमण कारवाईदरम्यान संसारपयोगी वस्तूंचे नुकसान करणे तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात सिडको मनपा विभागीय अधिकारी डॉक्टर मयूर पाटील तसेच अतिक्रमण विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह जागा मालकावर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ ऑक्टोबर २०२३ ला प्लॉट क्र. ३२, वृंदावननगर, कामाठवाडे याठिकाणी गेल्या पंचवीस वर्षांपासून वॉचमन म्हणून वंदनाबाई किसन अंभोरे (४८, मजुरी) या कुटुंबासहीत जागेच्या मालकाच्या सांगण्यावरून गेल्या २५ वर्षापासून राहत आहेत. परंतु दिनांक ४ ऑक्टोबरला सकाळी दहाला महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आले आणि कोणतीही पूर्वसूचना अथवा नोटीस न देता जागामालकाच्या सांगण्यावरून त्यांचे राहते घर जेसीबीच्या सहाय्याने तोडले. घरातील संसार उपयोगी साहित्य अतिक्रमण कर्मचारी सोबत घेऊन गेले. तसेच घर तोडत असताना घरावरील झेंडा व महापुरुषांचे फोटोंची तोडफोड करत नुकसान केले आणि परिवारातील सदस्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप फिर्यादींनी तक्रारीत केला आहे. याप्रकरणी नाशिक महापालिका सिडको विभागीय अधिकारी डॉ. मयूर पाटील यांच्यासह अतिक्रमण विभागाचे अधिकारी, कर्मचारी व जागेचे मालक सुरेंद्र खाडे तसेच ह एका तोतया पोलिसावर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. दरम्यान, याबाबत बोलताना डॉ. मयूर पाटील यांनी सांगितले की, मनापाच्या उपायुक्त कार्यालयाकडून आलेल्या आदेशानुसार कार्यवाही झालेली असून पोलीस तपासात याबाबत सत्य निष्पन्न होणार आहे.

The post नाशिक : सिडको महापालिका विभागीय अधिकाऱ्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा appeared first on पुढारी.