नाशिक : सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग : तीन तालुक्यांतील संयुक्त मोजणी पूर्ण

महामार्ग www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
समृद्धी महामार्गानंतर केंद्र सरकारच्या भारतमाला योजनेंतर्गत उभारण्यात येणार्‍या सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गामुळे नाशिक जिल्ह्याच्या दळणवळणाला बूस्ट मिळणार आहे. या प्रकल्पासाठी नाशिक, निफाड व सिन्नरमधील जमिनीच्या संयुक्त मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. लवकरच अन्य तीन तालुक्यांत मोजणीला प्रारंभ होणार असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली.

केंद्र सरकारने भारतमाला योजनेंतर्गत देशभरातील महत्त्वपूर्ण शहरे ग्रीनफिल्ड महामार्गाने जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात सुरत-चेन्नई ग्रीनफिल्डचा समावेश आहे. या महामार्गामुळे दोन्ही शहरांतील अंतर 1600 किलोमीटरवरून थेट 1 हजार 250 पर्यंत कमी होणार आहे. महाराष्ट्रात नाशिक, नगर व सोलापूर या जिल्ह्यांमधून हा प्रकल्प जाणार आहे. ग्रीनफिल्डसाठी नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, पेठ, दिंडोरी, नाशिक, निफाड व सिन्नर या सहा तालुक्यांमध्ये 977 हेक्टर जमिनीचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. या महामार्गामुळे नाशिक-सुरतमधील अंतर फक्त 176 किलोमीटरवर येणार असून, हा प्रवास सव्वा तासांमध्ये पूर्ण होईल. महसूल प्रशासनाने प्रकल्पाशी निगडीत अन्य यंत्रणांच्या सहायाने जमिनीच्या संयुक्त मोजणीचे काम हाती घेतले आहे. तीन तालुक्यांमधील मोजणीचे काम पूर्ण झाले. उर्वरित पेठ, सुरगाणा व दिंडोरीमध्ये संयुक्त मोजणीचे काम लवकरच प्रशासनाकडून हाती घेतले जाणार आहे. सहाही तालुक्यांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण झाल्यावर पुढील टप्प्यात अधिग्रहणासाठीचा मार्ग अधिक सुकर होईल.

जिल्ह्यातील प्रस्तावित गावे
सुरगाणा : बेंडवळ, बहुडा, दुधवळ, गहाळे, राक्षसभुवन, हस्ते, जहुळे, कहांडोळसा, कोटंबा, मर्दंड, पिंपळचोंड, संबरकहाळ
दिंडोरी : तेटमाळा, रडतोंडी, कवडासर, चिल्हार पाडा, महाजे, चाचडगाव, उमराळे बुद्रुक, जांबुटके, नाळेगाव, इंदोरे, राशेगाव, ननाशी, पिंपळनेर, रामशेज, आंबेदिंडोरी, ढकांबे, शिवनाई, वरवंडी, गांडोळे, गोळशी, बहूर, जर्लीपाडा, आंबेगाव.
पेठ : पाहुचीबारी, विर्मळ, कळंबरी, वडबारी, हरणगाव.
नाशिक : आडगाव, ओढा, विंचूरगवळी, लाखलगाव.
निफाड : चेहेडी खुर्द, चाटोरी, वर्‍हे, लालपाडी, रामनगर, दारणासांगवी, सावळी, तळवाडे, पिंपळगाव निपाणी.
सिन्नर : देशवंडी, पाटपिंप्री, निमगाव देवपूर, बारागाव पिंप्री, गुळवंच, देवपूर, खोपडी बुद्रुक, धारणगाव, फर्दापूर, पांगरी बुद्रुक, भोकणी, पांगरी खुर्द, फुलेगनर, कहांडळवाडी, घोटेवाडी, वावी.

  • नाशिक जिल्ह्यात 122 किलोमीटर अंतर
  • जिल्ह्यात 69 गावांत 997 हेक्टर होणार अधिग्रहित
  • सिन्नरच्या वावीत समृद्धी एक्स्प्रेसला छेदणार
  • काही ठिकाणी शेतकर्‍यांचा प्रकल्पाला विरोध
  • नाशिक, नगर, सोलापूर जिल्ह्यांमध्ये महामार्गाची उभारणी
  • राज्यात राक्षसभुवन (ता. सुरगाणा) येथे प्रवेश
  • अक्कलकोट (जिल्हा सोलापूर) येथे राज्याचे शेवटचे टोक
  • नाशिक – सोलापूर अंतर 50 किलोमीटरने होणार कमी

हेही वाचा:

The post नाशिक : सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग : तीन तालुक्यांतील संयुक्त मोजणी पूर्ण appeared first on पुढारी.