नाशिक : सेवानिवृत्तीच्या एक दिवस आधीच काळाचा घाला; तिहेरी अपघातात प्राध्यापक ठार

वणी अपघात,www.pudhari

दिंडोरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

दिंडोरी तालुक्यातील वलखेड फाटा येथे अल्टो कार, पिकअप व मोटरसायकल यांच्यात तिहेरी अपघात होऊन अल्टो कार मधील प्राध्यापक रामदास माधव शिंदे (रवळस ता. निफाड) यांचा जागीच मृत्यू झाला. शिंदे यांचा उद्या सेवानिवृत्ती सोहळा होता, मात्र त्याआधीच त्यांच्यावर काळाने असा घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

वलखेड फाटा येथे आज सोमवार (दि. २४) रोजी सकाळी साडेआठ वाजता हा अपघात झाला. प्राध्यापक रामदास माधव शिंदे हे आपल्या अल्टो (एम. एच १५ सीएम ४४७४) कारमधून नाशिक येथून वणीकडे ज्युनिअर कॉलेजला जात असताना वणीहून दिंडोरीकडे जाणारी पिकअप गाडी (एमएच १५ ईजी ५८३०) व पाठीमागून येणारी मोटरसायकल (एम एच १५ डीएच ४९३१) यांच्यात भीषण अपघात होऊन यात रामदास शिंदे जागीच ठार झाले.

मोटरसायकलवरील विठ्ठल पागे हे अपघातात जखमी झाले आहेत.  पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार टी. बी. जाधव, पोलीस नाईक एस. के. कडाळे हे अपघातासंबधि अधिक तपास करत आहे.

स्पीड ब्रेकरची मागणी 

वलखेड फाटा येथे टाकण्यात आलेले स्पीड बेकर हे फायबरचे असल्याने ते लवकर खराब झाले आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका आहे. स्पीड बेकर हे चांगल्या प्रकारचे टाकण्यात यावे व त्याची जागा बदलून दिंडोरी बाजूला पाठीमागे घेण्यात यावे अशी मागणी वलखेड येथील ग्रामस्थ व वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : सेवानिवृत्तीच्या एक दिवस आधीच काळाचा घाला; तिहेरी अपघातात प्राध्यापक ठार appeared first on पुढारी.