नाशिक : स्मार्ट रोडवरील सायकल ट्रॅकने घेतला मोकळा श्वास

नाशिक सायकल ट्रॅक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जुने सीबीएस ते मेहेर सिग्नलपर्यंत असलेल्या स्मार्ट रोडवरील सायकल ट्रॅकवर दोन्ही बाजूला दररोज चारचाकी वाहने उभी असतात. मात्र, बुधवारी (दि.२१) शहर वाहतूक शाखेने या ठिकाणी वाहतूक पोलिस तैनात केल्याने या मार्गावर कोणतेही वाहन उभे राहिले नाही. त्यामुळे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर या रस्त्याने मोकळा श्वास घेतल्याचे दिसून आले.

स्मार्ट सिटीअंतर्गत शहरातील अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका सिग्नलपर्यंत स्मार्ट रोड बनवण्यात आला आहे. यात पादचाऱ्यांसाठी फुटपाथ, सायकल ट्रॅकचाही समावेश आहे. मात्र सीबीएस ते मेहेर सिग्नलदरम्यान असलेल्या जिल्हा न्यायालय व जिल्हाधिकारी कार्यालयात येणारे नागरिक फुटपाथ व सायकल ट्रॅकवरच वाहने उभी करत असतात. त्यामुळे पादचाऱ्यांना चालणे अवघड झाले होते, तर वाहतुकीसाठी पुरेसा रस्ता उपलब्ध होत नव्हता. कार पार्किंगमुळे सायकल ट्रॅकच्या दुभाजकांचेही नुकसान झाले आहे. याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने ही समस्या कायमची झाली आहे. या विषयाला दै. ‘पुढारी’नेही वाचा फोडली होती. अखेर शहर वाहतूक पोलिसांनी याची दखल घेत बुधवारी (दि.२१) सकाळी एका वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याची नेमणूक करीत या ठिकाणी वाहने उभी करणाऱ्यांना अटकाव घालण्यात आला. त्यामुळे चालकांनी त्यांची वाहने इतरत्र लावल्याने हा मार्ग मोकळा झाला होता.

हेही वाचा :

The post नाशिक : स्मार्ट रोडवरील सायकल ट्रॅकने घेतला मोकळा श्वास appeared first on पुढारी.