नाशिक : ५० ग्रामपंचायतींत निवडणुकांमुळे ‘एक गाव एक गणपती’

दिंडोरी www.pudhari.news

नाशिक(दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील एकूण 50 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून, या 50 ग्रामपंचायतींमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना राबविण्यात येईल. आचारसंहितेचा भंग झाल्यास, कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा दिंडोरीचे पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी दिला.

जानोरीला ग्रामपंचायत सभागृहात गणेशोत्सव मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पोलिस निरीक्षक वाघ बोलत होते. सध्या 50 ग्रामपंचायतींच्या निवडणुका असल्याने तेथे आचारसंहिता लागू झालेली आहे. गणेशोत्सव काळात एखाद्या मंडळाकडून आचारसंहितेचा भंग झाल्यास कारवाईला सामोरे जाण्याची दाट शक्यता असल्याने हा गणेशोत्सव साजरा करताना ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना राबविण्याचे आवाहन यावेळी वाघ यांनी केले. तसेच विनापरवानगी गणेश मंडळांकडून काही अनावश्यक पाऊल उचलले गेल्यास, त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारादेखील देण्यात आला. हा निर्णय फक्त एका गावासाठी नसून, तालुक्यातील 50 गावांना हाच नियम लागू असेल, असेदेखील सांगण्यात आले. यावेळी दिंडोरी पोलिस ठाण्याचे राजेंद्र लहारे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष रेवचंद वाघ, गणेश तिडके, सुनील घुमरे, किशोर विधाते, शंकर घुमरे, संदीप घुमरे, योगेश गोजरे यांच्यासह विविध मंडळांचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

हेही वाचा:

The post नाशिक : ५० ग्रामपंचायतींत निवडणुकांमुळे ‘एक गाव एक गणपती’ appeared first on पुढारी.