नेत्यांचे युती, आघाडीसाठी ‘पॅचअप’; स्थानिक स्तरावर मात्र ‘ब्रेकअप’

नाशिक www.pudhari.news

नाशिक : सतिश डोंगरे

निमित्त

शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीनंतर राज्यातील राजकीय समीकरणे पूर्णत: बदलली असून, आगामी निवडणुकांमध्ये नेमके काय चित्र असणार, याची उत्सुकता सर्वांना आतापासूनच लागून आहे. त्यातच भाजप-सेनेसह इतर पक्षांमधील इच्छुकांची भाऊगर्दी असल्याने तिकिटाची लॉटरी नेमकी कोणाला लागणार, याचीही उत्सुकता आहे.

सध्या युती आणि आघाडीसाठी पक्षीय स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. त्याकरिता नेत्यांच्या दररोज जोर बैठका पार पडत आहेत. अर्थात, हवेदावे असल्याने अजूनही ‘पॅचअप’ होत नसले तरी प्रमुख नेत्यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र, नाशिक लोकसभा मतदारसंघातील इच्छुक ‘पॅचअप’ऐवजी ‘ब्रेकअप’वरच अधिक जोर देवून असल्याने लोकसभेची निवडणूक लक्षवेधी ठरण्याची चिन्हे आतापासूनच दिसू लागली आहेत.

२०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्याने त्याचा नाशिक लोकसभा मतदारसंघावर स्पष्टपणे प्रभाव दिसून येत आहे. या मतदारसंघातील विद्यमान खासदार शिवसेनेचे असले तरी शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे त्यांची ताकद कमी झाल्याचा कयास लावला जात आहे. २०१४, २०१९ या दोन्ही पंचवार्षिक निवडणुकीत बाजी मारणारे गोडसे, सध्या शिवसेना-शिंदे गटाकडून हॅट्ट्रीक साधण्याच्या तयारीत असले तरी त्यांना गड राखणे सोपे जाणार नाही. दुसरीकडे, शिंदे गटाचा मित्र पक्ष असलेल्या भाजपकडून इच्छुकांची मोठी यादी असल्याने हा मतदारसंघ नेमका कोणाला सोडला जाईल, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण ज्या पद्धतीने भाजप नाशिक लोकसभा मतदारसंघात तयारी करीत आहे, त्यावरून युतीत मिठाचा खडा पडल्यास भाजप पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरेल यात शंका नाही. दुसरीकडे, भाजपकडून इच्छुकांची संख्याही मोठी असल्याने, भाजपच्या मनात आहे तरी काय? हे सांगणे अवघड आहे. ठाकरे गट आणि राष्ट्रवादीची काहीशी अशीच गत आहे. वास्तविक, गेल्या दोन टर्मपासून नाशिक लोकसभा मतदारसंघ शिवसेना-ठाकरे गटाचा राहिला असल्याने ठाकरे गट या मतदारसंघावर दावा ठेवून आहे. शिवाय ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांची उमेदवारी यापूर्वीच जाहीर केली असून, ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनीदेखील वारंवार करंजकर यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. त्यामुळे आगामी लोकसभेत शिवसेना ठाकरे गट करंजकर यांना मैदानात उतरवेल याच शंका नाही. मात्र, त्याचबरोबर राष्ट्रवादीदेखील या मतदारसंघावर दावा ठोकून असल्याने, स्थानिक स्तरावर आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे.

२००९ च्या निवडणुकीत माजी मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ हे मोठ्या मताधिक्क्याने निवडून आले होते. अशात भुजबळ कुटुंबाकडून यंदाच्या लोकसभेसाठीही नाशिक लोकसभा मतदारसंघातून दंड ठोठावण्याची तयारी केली जात आहे. दुसरीकडे, मविप्र संस्थेचे सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरेही तयारीत आहेत. सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माणिकराव कोकाटे हेदेखील खासदारकीच्या आखाड्यात उतरण्याची तयारी करीत आहेत. त्यामुळे नेत्यांकडून आघाडीसाठी पुरेपूर प्रयत्न केले जात असले तरी स्थानिक स्तरावर बिघाडी व्हावी, अशी इच्छुकांची अपेक्षा नसेल तरच नवल. दुसरीकडे यंदाच्या नाशिक लोकसभा निवडणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज तथा स्वराज्य संघटनेचे प्रमुख माजी खासदार युवराज संभाजीराजेदेखील पूर्ण तयारीत असल्याने हा फॅक्टर स्थानिक राजकारणाला कलाटणी देणारा ठरू शकेल. संभाजीराजे यांनी नुकतीच पुण्याच्या अधिवेशनात आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे घोषित केले. तसेच नाशिक लोकसभा मतदारसंघातून ते इच्छुक असल्याचे यापूर्वीही त्यांनी अप्रत्यक्षपणे स्पष्ट केले आहे. अशात निवडणुकीच्या रिंगणात छत्रपतींचे वंशज उतरल्यास बरीच उलथापालथ होण्याची शक्यता आहे. एकंदरीत, सद्यस्थितीत आगामी लोकसभेसाठी अनेक दिग्गज तयारीत असल्याने, युती आणि आघाडीत ‘ब्रेकअप’ व्हावे हीच इच्छुकांची मनोमन इच्छा असेल.

The post नेत्यांचे युती, आघाडीसाठी ‘पॅचअप’; स्थानिक स्तरावर मात्र ‘ब्रेकअप’ appeared first on पुढारी.